Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘माँ भटाई ग्रुप’ करणार शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने ‘माँ भटाई ग्रुप’च्या वतीने जळगाव शहरातील ‘अयोध्या नगर’ भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमा संदर्भातली माहिती ‘माँ भटाई ग्रुप’चे अध्यक्ष प्रदीप पाटील आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, “जळगाव शहरात दि.१९ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माँ भटाई ग्रुपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, उद्घाटक म्हणून जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, मनोज चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

‘माँ भटाई ग्रुप’ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव दि.१९ व २० फेब्रुवारी या दोन दिवशी साजरा केला जाणार आहे. दि.१९ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून त्यानंतर रात्री वाजत गाजत जल्लोष मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर दि.२० फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार शाळकरी मुलांपर्यंत पोहचावेत म्हणून इयत्ता ५ ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, शाहीर आलंम वाघणेकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा पोवाडा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

शिव जन्मोत्सवानिमित्त गरिबांना अन्नदान, चरित्र वाचन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हे सर्व कार्यक्रम शासनाने घोषित केलेल्या कोविड नियमावलीला अनुसरून घेतले जाणार आहेत. माँ भटाई ग्रुप आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version