Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंटतर्फे ‘गुरुपोर्णिमा’ निमित्त जाहीर व्याख्यान

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | ‘गुरुपोर्णिमा – व्यासपूजा’ निमित्ताने मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला लाभलेल्या व्याख्याता, युवा कीर्तनकार ह. भ. प. कु. नम्रताताई गणोरकर (चांदूर बाजार, जि. अमरावती) यांनी ‘गुरु भक्ती – अध्यात्मिक रहस्य’ या विषयावर मार्गदशन केले. आपल्या व्याख्यानातून त्यांनी खरा गुरु कसा असावा, लौकिक आणि आध्यात्मिक गुरु, जीवनातील गुरूंचे महत्व, गुरु भक्तीचे रहस्य इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला. हे पटवून देताना त्यांनी अनेक संतांच्या साहित्यातील संदर्भ देवून गुरु परंपरेवर सुद्धा प्रकाश टाकला. उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या जीवनात गुरुस्थानी श्रद्धा ठेवावी आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण करून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी असा उपदेश दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. सं. ना. भारंबे (प्राचार्य, मू. जे. महाविद्यालय जळगाव) प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे (अध्यक्ष, के. सी. ई. सोसायटी, जळगाव) यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. गीतांजली भंगाळे यांनी ओंकार प्रार्थनेने केली. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून प्रा. पंकज खाजबागे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व पटवून दिले आणि सोहम योग विभागामध्ये सुरु असलेल्या योग – निसर्गोपाचारचे अभ्यासक्रम आणि उपक्रमांची माहिती दिली. डॉ. देवानंद सोनार (संचालक, सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी) यांनी आपल्या मनोगतातून योग मार्गातील गुरु परंपरा आणि गुरुची महती पटवून दिली. सूत्रसंचालन व आभार प्रा. ज्योती वाघ यांनी केले. कार्यक्रमाला योग- निसर्गोपचार विभागातील प्राध्यापक, योगप्रेमी साधक, बी. ए. आणि एम. योगिक सायन्स, योगशिक्षक पदविका, नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली.

Exit mobile version