Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लंपीने मृत झालेल्या गुरांसाठी मिळणार ‘इतकी’ भरपाई : जीआर जारी !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार लंपी आजाराने मरण पावलेल्या गुरांच्या बदल्यात पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार असून याबाबतचा शासन आदेश आज जारी करण्यात आला आहे.

राज्या सध्या लंपी या संसर्गजन्स व्याधीने मोठा हलकल्लोळ उडालेला आहे. हा रोग गुरांना होत असून याच्या संसर्गाचे प्रमाण खूप मोठे असल्याने पशुपालक धास्तावले आहेत. एका अर्थाने हा गुरांवरील कोरोना मानला जात आहे. जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये याचा संसर्ग वाढीस लागला असून अनेक गुरे यामुळे मृत झाली आहेत.

गेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत लंपीने मृत झालेल्या गुरांच्या बदल्यात एनडीआरएफच्या निकषानुसार भरपाई देण्याचा निर्णय झाला होता. याचा जीआर आज जारी करण्यात आलेला आहे. यानुसार, गाय व म्हैस या दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर ३० हजार रूपये भरपाई मिळणार आहे. ओढकाम करणार्‍या बैलांसाठी प्रति जनावर २५ हजार तर वासरांसाठी प्रति जनावर १६ हजार रूपये भरपाई मिळणार असल्याचे या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, लंपीच्या नुकसान भरपाईसाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येणार असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याचे अध्यक्ष राहणार आहेत. यात जिल्हाधिकार्‍यांसह वरिष्ठ अधिकारी सदस्य असतील असेही या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version