Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खुशखबर : शालीमार एक्सप्रेस आता पूर्ववत सुरू होणार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोरोनाच्या आपत्तीमुळे गत सुमारे सव्वा दोन वर्षांपासून बंद असणार्‍या लोकमान्य टिळक टर्मीनस-शालीमार एक्सप्रेस पूर्ववत सुरू होणार असून यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना सुविधा उपलब्ध होणार आहे.

कोरोनामुळे बंद असलेल्या अनेक ट्रेन्स आज देखील बंद आहेत. यात लोकमान्य टिळक टर्मिनस-शालीमार (कोलकाता) म्हणजेच १८०२९ डाऊन आणि शालीमार-लोकमान्य टर्मीनस १८०३० अप या एक्सप्रेसचा समावेश होता. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. ही गाडी सुरू करण्याची कधीपासूनच मागणी करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमिवर, रेल्वे प्रशासनाने ही एक्सप्रेस पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या अनुषंगाने उद्या दिनांक १२ जुलैपासून शालीमार ते लोकमान्य टर्मीनस एक्सप्रेस सुरू होत आहे. तर एलटीटी ते शालीमार ही ट्रेन १४ जुलैपासून सुरू होणार आहे. जिल्ह्यातील प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, वरणगाव आणि बोदवड या रेल्वे स्थानकांवर या दोन्ही ट्रेन्सला थांबा आहे. लोकमान्य टिळक टर्मीनसवरून रात्री १० वाजता सुटणारी ही ट्रेन सकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी जळगावला पोहचते. तर दुसर्‍या मार्गाचा विचार केला असता जळगाव येथून रात्री ८ वाजून ५८ मिनिटांनी येणारी ही ट्रेन सकाळी ४ वाजून ५ मिनिटांनी लोकमान्य टर्मीनसला पोहचते.

Exit mobile version