Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदुर्णी नगरपंचायतमध्ये निविदा अटीशर्ती भंग करून राजरोस निधीची लूट

शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेंदुर्णी नगरपंचायतीच्या माध्यमातून प्राध्यापक कॉलनी, शिवदत्त नगर भागात रेडी मिक्स सिमेंट ऐवजी साध्या मिक्सर फ्यूरी मशीनने रस्ते बनविले जात आहे. त्यामुळे ठेकेदारांना निविदेतील अटी शर्तीचा भंग करून रेडी मिक्स सिमेंट न वापरता होणाऱ्या बोगस कामांचे देयके अदा करण्यात येऊ नये अशी मागणी  राष्ट्रवादीचे स्नेहदीप संजय गरूड मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

शेंदुर्णी शहरातील नगर पंचायतीने ४ कोटी विशेष रस्ता अनुदान योजनेतून १५ रस्त्यांच्या कामांसाठी स्वतः अटी शर्ती टाकून निविदा प्रसिद्ध केली व ठेकेदाराला काम दिले. सदर निविदा अटीशर्तीनुसार ठेकेदाराचा स्वतःचा रेडी मिक्स सिमेंट प्लांट आरएमसी) असणे आवश्यक होते. अश्याच ठेकेदाराने निविदा भरावी ही मुख्य अट होती. तसा करार नामाही केलेला असतांना या निधीतून प्राध्यापक कॉलनी, शिवदत्त नगर भागात प्रत्यक्ष रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली असून तिथे रेडी मिक्स सिमेंट ऐवजी साद्या मिक्सर फ्यूरी मशीनने रस्ते बनविले जात आहेत तसेच निविदेतील अटी नुसार कामाच्या ठिकाणी आवश्यक मशनरी नाहीत व अंदाज पत्रकातील तरतूदी नुसार ६ इंच रस्ते खोदून माती काढून आधी मुरूम त्यावर खडी पुन्हा मुरूम भराई करून रोलर ने दाबाई करणे त्यावर ४ इंची कच्चा नंतर रेडी  मिक्स प्लांट मधून आलेल्या मटेरियल मधून एम- थर्टी लेयर मध्ये रस्ते होणे आवश्यक आहे. ती प्रक्रिया न करता नुसती खडी पसरवून साधे फ्यूरि मिक्स सिमेंटचा एक थर दिला जात आहे.

कामावर ठेकेदार व त्याचे कंपनी सुपर वायझर हजर नसून सर्व बोगस कामे नगर पंचायत पदाधिकारी यांचे देखरेखीत सुरू आहे. सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी नगर पंचायत मुख्याधिकारी, संबंधित बांधकाम इंजिनिअर फिरकत नसून बघ्याची भूमिका घेऊन रस्ते कामात भ्रष्टाचार करायला वाव देत आहे. यामुळे जनतेला उत्कृष्ठ रस्ते देण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निधीवर राजरोसपणे डल्ला मारला जात आहे. कामातील भ्रष्टाचारामुळे शासनाची प्रतिमाही खराब होत आहे म्हणून ना. गिरीश महाजन यांनी नगर पंचायतचे भाजप पदाधिकाऱ्यांना वेळीच तंबी देणे आवश्यक आहे.

विशेष रस्ता अनुदान निधी देखरेख अधिकारी जिल्हाधिकारी जळगांव यांनी निविदा अटी शर्तीचां भंग करून रेडी मिक्स सिमेंट न वापरता होणाऱ्या बोगस कामांचे देयके अदा करण्यात येऊ नये याविषयी नगर पंचायत मुख्याधिकारी व बांधकाम इंजिनियर यांना लेखी आदेश द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे स्नेहदीप संजय गरूड यांनी केली आहे. विशेष म्हणजे माहिती कायदा २००५ नुसार योग्य फी भरून सदर कामांची अंदाज पत्रके व दर पत्रके करावयाची कामे संबंधित सर्व कागदपत्रे गरूड यांनी कामाच्या ठिकाणी नागरिकांना दाखवली.

Exit mobile version