लोकजनशक्ती पार्टी स्वतंत्रपणे लढवणार निवडणूक

पाटणा – नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला विरोध करणाऱ्या लोकजनशक्ती पार्टीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

  बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी एनडीएमध्ये उभी फूट पडली आहे.   बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय बोर्डाची बैठक चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झाली. या बैठकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक न लढवण्याचा आणि लोजपा भाजपा सरकारचा प्रस्ताव पारित कण्यात आला. लोजपाचे सर्व आमदार मोदींचे हात बळकट करतील, असे ठरवण्यात आले. 

याबाबत लोकजनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस अब्दुल खालिक यांनी बैठकीबाबत माहिती देताना सांगितले की, वैचारिक मतभेदांमुळे लोकजनशक्ती पार्टी जनता दल युनायटेडसोबत बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. मात्र राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि लोकजनशक्ती पार्टीची आघाडी मजबूत असेल.

 केंद्राप्रमाणेच बिहारमध्येसुद्धा भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार बनावे, अशी लोकजनशक्ती पार्टीची इच्छा आहे. आता लोकजनशक्ती पार्टीचा प्रत्येक आमदार भाजपाच्या नेतृत्वाखाली बिहारला फर्स्ट बनवण्यासाठी प्रयत्न करेल, अशी घोषणा लोकजनशक्ती पार्टीने केली आहे.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या महाआघाडीने शनिवारी जागा वाटप जाहीर केले. सर्व पक्षांनी तेजस्वी यादव यांना आघाडीचे नेते म्हणून समर्थन दिले. या आघाडीत २४३ सदस्यीय विधानसभेत राजद १४४, काँग्रेस ७० जागा लढविणार आहे. माकपा ६, भाकपा ४ आणि भाकपा (माले) यांना १९ जागा देण्यात आल्या आहेत.

Protected Content