Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अयोध्येत मशीद उभारणाऱ्या ट्रस्ट चा लोगो जारी

अयोध्या, वृत्तसंस्था । अयोध्येत सर्वोच्च न्यायालयाद्वारे मशिदीच्या निर्माणासाठी देण्यात आलेल्या पाच एकर जमिनीवरही मशिद आणि इतर बांधकामांसाठी हालाचाली सुरू झाल्यात. अयोध्येच्या धनीपूरमध्ये मशिद उभारली जाणार आहे. ही जबाबदारी हाताळणाऱ्या ‘इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन’नं अधिकृत लोगो जारी केलाय.

संबंधित लोगोमध्ये दिल्लीस्थित ‘हुमायू’ मकबऱ्याची छाप पाहायला मिळतेय. मशिद निर्माण कार्य, व्यवस्था किंवा इतर अधिकृत कामांसाठी या लोगोचा वापर केला जाणार आहे.

‘इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन’ ट्रस्टचा लोगो बहुभुज आकाराचा आहे. मशिद ट्रस्टचे सचिव अतहर हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा लोगो इस्लामी प्रतिक रब-अल-हिज्ब आहे. अरबीमध्ये ‘रब’ याचा अर्थ आहे ‘एक चतुर्थांश’ आणि ‘हिज्ब’चा अर्थ आहे ‘एक समूह’… ६० हिज्बमध्ये विभाजीत करण्यात आलेलं कुराण पाठ करण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे. या प्रतिकाचा वापर अरबी कॅलिग्राफीमध्ये ‘अध्याय’ चिन्हीत करण्यासाठी केला जातो.

इंडो इस्लामिक आर्किटेक्चरमध्ये अनेक ठिकाणी याचा वापर करण्यात आलाय. दिल्लीचा हुमायू मकबरा याच प्रतिकाशी मिळता-जुळता बनवण्यात आलाय. कुराणाच्या अध्यायाच्या समाप्तीनंतरही या आकृतीचा वापर करण्यात आलाय. या चिन्हाचा वापर इस्लामिक झेंड्यावरही केला जातो.

मशिदीसोबतच इथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल, सामूदायिक किचन आणि ग्रंथालयाचं निर्माण केलं जाणार आहे. याचा वापर सर्व समुदायाच्या लोकांसाठी खुला असेल. ट्रस्टमध्ये एकूण १५ सदस्यांचा समावेश असेल. ९ जण ट्रस्टमध्ये सहभागी झालेत आणखी ६ जणांची नावं येणं बाकी आहे

Exit mobile version