Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकिंग : राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाउन कायम – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई वृत्तसंस्था । लॉकडाउनचा कालावधी उद्या संपणार आहे. राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे दिसत असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. त्यामुळे पुढील १५ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ”जनतेवर निर्बंध लादावे लागतात या सारखं दुसरं कटू काम नाही, असं मला वाटत नाही. पण ते मला नाईलाजाने करावे लागत आहे. आपल्या राज्याच्या व सर्वांच्या जीवाच्या काळजी पोटी करावे लागत आहे.  ”काहीजण असं म्हणत आहेत की लाट आता ओसरत आहे, मग आता काय करणार हे निर्बंध उठवणार का? याबाबत देखील तुम्हाला माहिती देण्याची आवश्यकता वाटते, की नेमकं आपण कुठं आहोत? आज राज्यात १८ हजारांच्या आसपास रूग्ण संख्या आहे. मात्र दोन-चार दिवसांअगोदरचा आकडा पाहिला तर, गेल्या लाटेत जी सर्वोच्च संख्या होती. तिच्या तुलनेत आता थोडीशी कमी होते आहे. त्यावेळी आपण जे शिखर गाठलं होतं. ते सणासुदीच्या नंतर गाठलं होतं. यंदा ही परिस्थिती सणासुदीच्या अगोदर आलेली आहे. १७ ते १९ सप्टेंबर २०२० मध्ये राज्यात साधारण एका दिवसात आढळणारी रूग्ण संख्या ही २४ हजार होती. आता २६ मे रोजी २४ हजार ७५२ एवढे रूग्ण आढळलेले आहेत. आज साधारण ही संख्या १८ हजारापर्यंत आली आहे. म्हणजे अजूनही आपण म्हणावं तेवढं खाली आलेलो नाही. मात्र दिलासादायक बाब म्हणजे यावेळी रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ टक्क्यांवर आहे. त्यामुळे आता आपण निर्बंध लावत आहोत, पण कडक लॉकडाउन केलेला नाही.  त्यामुळे पुढील पंधरा दिवसांसाठी म्हणजे १५ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली.

Exit mobile version