Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. मंगेश चव्हाण यांचेही म्हणणे ऐकून घ्यावे : रवींद्र शिंदे यांची मागणी

जळगाव प्रतिनिधी । शिक्षक बदली प्रकरणात कथितरित्या मध्यस्थी करण्याचा दावा करणारे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचेही या प्रकरणात म्हणणे ऐकून घ्यावे अशी मागणी तक्रारदार रवींद्र शिंदे यांनी केली आहे.

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शिक्षक बदलीप्रकरणातील लाच प्रकरण चव्हाट्यावर आणले होते. यानंतर, या प्रकरणात शिक्षक आणि शिक्षणाधिकारी यांनी लेखी पत्र देऊन आमदार मंगेश चव्हाण यांची या प्रकरणात कोणतीही भूमिका नव्हती असा जबाब दिला आहे. या पार्श्‍वभूमिवर, संबंधीत प्रकरणात आमदारांनी स्वत: मध्यस्थी केलेली असल्याने त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात यावे, अशी लेखी मागणी या प्रकरणाचे तक्रारदार रवींद्र शिंदे यांनी चौकशी अधिकार्‍याकडे केली आहे.

या संदर्भातील निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शिक्षक बदलीप्रकरणात शिक्षक आणि शिक्षणाधिकारी या दोघांमध्ये लाचेची देवाण-घेवण झाल्याच्या प्रकरणात आमदार मंगेश चव्हाण यांनी या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी मध्यस्थीची भूमिका बजावली आहे. आमदार चव्हाण हे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व आहेच. या प्रकरणात त्यांनी केलेल्या वक्तव्यावर ते अजूनही ठाम असून त्यांनी इनकॅमेरा पुन्हा शिक्षणाधिकार्‍यांनी लाच घेतल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची दोन वेळा भेट देखील घेतली आहे. या प्रकरणात त्यांच्या जबाबाला विशेष महत्व असून चौकशीमध्ये आमदार चव्हाण यांचाही जबाब नोंदविण्यात यावा अशी मागणी रवींद्र शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने आमदारांचा जबाब न घेता शिक्षक, शिक्षणाधिकार्‍यांची पाठराखण केल्यास संबधित आमदारांनी त्यांच्या अधिकार्‍यांची बदनामी केली म्हणून त्यांच्यावर कारवाई तरी करावी अशी मागणी देखील रवींद्र शिंदे यांनी केली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

Exit mobile version