Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुधाचे दर लवकरच वाढण्याची शक्यता

 

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आपला महिन्याचे खर्चाचे बजेट लवकरच कोलमडण्याची शक्यता आहे. कारण पुन्हा एकदा दुधाची दरवाढ होणार असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. क्रिसिलच्या रिपोर्टनुसार, स्किम्ड मिल्कच्या उत्पादनात आलेली घट आणि दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मागणीमुळे दुधाचे दर पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता आहे. दुधाचे हे वाढलेले दर येत्या तिमाहीमध्ये लागू होण्याची शक्यता आहे.

दुधाचे दर वाढल्यानंतर इतर डेअरी उत्पादने जसे की, लोणी, तूप, दही आणि फ्लेवर्ड मिल्क हे ही महागणार आहेत. परंतु अमूल आणि मदर डेअरीनं अद्यापही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. दूध, आइसक्रीम यांसारख्या इतर दुधाच्या उत्पादनांची किंमत वाढणार असून, उत्पादनाच्या तुटवड्यामुळे दुधाच्या दरात प्रतिलिटर १ ते २ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच २०१९-२०मध्ये दुधाचे उत्पादन ३ ते ४ टक्क्यांनी घटण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे दुधाचा तुटवडा हा ६ ते ७ टक्क्यांनी वाढणार असून, त्यामुळेच दुधाची मोठी टंचाई जाणवणार आहे. २०१७ मध्येही दुधाच्या दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ झाली होती. जगभरात स्किम्ड मिल्कचा दर २० टक्क्यांनी वाढला आहे. मार्च २०१८ च्या शेवटी स्किम्ड मिल्कचा तीन लाख टन साठा होता. परंतु हा साठा आता २५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version