Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुली नको म्हणत बायकोला मारून टाकणाऱ्या नवऱ्याला जन्मठेप

जळगाव प्रतिनिधी । मुलीच होत असल्याच्या कारणावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

पप्पु रतन पवार (वय-३१) रा. विवेकानंद नगर तांडा ता. पाचोरा. जि.जळगाव असे आरोपीचे नाव आहे. 

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील विवेकानंद तांडा येथे पप्पु पवार हा आपली पत्नी कस्तुरबाई पप्पू पवार (वय-३०) आणि तीन मुलींसह राहत होता. ९ जुन २०१९ रोजी रात्री पप्पु पवार याचे पत्नी कस्तुरबाई यांच्याशी मुलीच होता या कारणावरून भांडण झाले होते. त्यादिवशी पप्पु हा दारूच्या नशेत होता. भांडणात रागाच्या भरात पप्पूने पत्नी कस्तूरबाई यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. जखमीवस्थेत पाचोरा रूग्णालयात दाखल केले असता वैद्कीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मयत कस्तूरबाई यांच्या आई पद्माबाई सखाराम राठोड यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीसात भा.द.वि.कलम ३०२,५०४ अन्वये गु.र.नं.२३७/१९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी संशयित म्हणून पती पप्पु पवार याला पोलीसांनी अटक केली होती.

संशयित आरोपीचा खटला तत्कालीन जिल्हा प्रमुख न्या. सानप यांच्या न्यायालयात चालला.  सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी आठ साक्षीदार तपासले, परंतु त्यांची बदली झाल्यामुळे व त्यानंतर कोरोनाच्या निर्बंधामुळे सदर खटला पुढे चालु शकला नव्हता, परंतु त्यानंतर डिसेंबर २० मध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमालानी यांच्या समोर सरकार पक्षाने उर्वरित दोन साक्षीदार तपासून ह्या खटल्याचे कामी पुरावा ठेवण्याचे काम पूर्ण केले. या खटल्याचे कामी जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी एकूण १० साक्षीदार तपासले. यात प्रामुख्याने आरोपीची मोठी मुलगी गौरी हिची साक्ष महत्वपुर्ण ठरली, कारण ही सर्व घटना तिच्या समोर घडलेली असल्यामुळे तिने सर्व घटनाक्रम जसाचा तसा न्यायालयासमोर सांगितला. सोबत फिर्यादी पद्मबाई राठोड, डॉ. निलेश देवराज पंच साक्षीदार, पोउनि पंकज शिंदे यांच्या साक्षी महत्वाच्या झाल्यात.

साक्षीदार व पुरावाच्या आधारावर न्या. जगमालानी यांनी पप्पु पवार याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि ५ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.  सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली.दरम्यान गुन्हा घडल्यानंतर अटक झाल्यापासून आरोपी पती पप्पु पवार हा कारागृहातच होता. आज न्यायालयाने सदरची शिक्षा व्हिडिओ कॉन्फरन्स वर सुनावणी घेऊन ठोठावली.

Exit mobile version