Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोगस खत प्रकरणी ‘त्या’ कंपनीचा परवाना रद्द : ना. गिरीश महाजनांचा पाठपुरावा

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील तोंडापूरसह परिसरातील गावांमध्ये बोगस खत्यामुळे शेकडो शेतकर्‍यांची पेरणी वाया गेली असून या प्रकरणात दोषी आढळलेल्या कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ना. गिरीश महाजन यांनी या प्रकरणी पाठपुरावा केला.

 

जामनेर तालुक्यातील तोंडापूर तसेच परिसरातील मोयखेडा दिगर, तोरनाळे आदी १७ गावांमधील २८४ शेतकर्‍यांनी मेसर्स सरदार ॲग्रो फर्टीलायझर अँड केमिकल ॲग्रो प्रा. लि. या कंपनीचे सिंगल सुपर फॉस्पेट हे खत पेरणी करतांना वापरले होते. यामुळे या सर्व शेतकर्‍यांच्या शेतातील पेरणीचे पीक हे वाया गेले होते. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या प्रमाणात संतापले होते. या शेतकर्‍यांनी तोंडापूर येथील कृषी केंद्राच्या बाहेर आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला होता.

 

शेतकर्‍यांच्या या समस्येची माहिती जाणून घेत राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना. गिरीश महाजन यांनी शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही दिली. नंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यात या कंपनीचा दोष आढळून आल्यामुळे मेसर्स सरदार ॲग्रो फर्टीलायझर अँड केमिकल ॲग्रो प्रा. लि. ( भालगम, तालुका वाकनेर, जिल्हा मोरबी, गुजरात ) या कंपनीचा खत विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या संदर्भात संचालक नि.व.गु.नि. कृषी आयुक्तालय, पुणे यांनी आज आदेश जारी केले आहेत.

 

दरम्यान, खत विक्रेत्या कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला असला तरी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

Exit mobile version