Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घराणेशाहीच्या मोहातून बाहेर पडा ! : युपीतील माजी काँग्रेस नेत्यांचे सोनियांना पत्र

लखनऊ । काँग्रेसमधील अंतर्गत कलह कमी होण्याचे नाव घेत नसतांनाच आता उत्तरप्रदेशातील निलंबीत करण्यात आलेल्या नऊ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून त्यांनी घराणेशाहीच्या मोहतून बाहेर पडत खंबीर निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रात सत्तेपासून दूर गेलेल्या काँग्रेस पक्षातील पक्षांतर्गत घमासान थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. विद्यमान वरिष्ठ नेत्याच्या नाराजीनाम्यानंतर आता गेल्या वर्षी पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या उत्तर प्रदेशच्या ९ वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसचे अस्तित्व कायम राखण्यासाठी कठोर आणि निःपक्षपाती पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस पक्ष हा केवळ देशाच्या राजकारणातील इतिहासाचा भाग बनून राहू नये म्हणून परिवाराचा मोह आवरा आणि खंबीर निर्णय घेऊन पक्षाचे अस्तित्व राखा, असे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष कधी नव्हता इतका दुबळा झाला आहे हे कुठेतरी थांबायला हवे असे सोनियाजींना लिहिलेल्या पत्रात या नेत्यांनी म्हटले आहे. यूपीत काँग्रेसच्या प्रमुख पदांवर पगारी नेत्यांनी कब्जा मिळवलेला आहे. जे पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाहीत आणि ज्यांना पक्षाची विचारधाराही अवगत नाहीय अशा नेत्यांच्या हातात युपीच्या काँग्रेसची धुरा जावी याहून ते मोठे दुर्दैव कोणते ? अशी खंतही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील माजी खासदार संतोष सिंह, माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी, माजी आमदार विनोद चौधरी, भूधर नारायण मिश्रा, नेकचंद पांडे, स्वयं प्रकाश गोस्वामी आणि संजीव सिंह यांनी हे पत्र लिहलेले आहे.

Exit mobile version