ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून कर्मचार्‍यांच्या मागण्या मार्गी लावणार-विष्णू भंगाळे

जळगाव प्रतिनिधी । विद्यापीठीय व महाविद्यालयीन कर्मचार्‍यांच्या मागण्या पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कर्मचार्‍यांनी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी केले आहे.

सध्या विद्यापीठीय व महाविद्यालयीन कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. या पार्श्‍वभूमिवर माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून कर्मचार्‍यांना आवाहन केले आहे. यात म्हटले आहे की, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लेखणीसह अवजार बंद आंदोलनामुळे राज्यभरात विपरीत परिस्थिती उद्भवलेली आहे. कर्मचारी संघटनांनी जळगावला १८ सप्टेंबर रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचेशी सकारात्मक चर्चा केली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आंदोलक संघटनांनी परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात, उच्च व  तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घ्यावी, आपले म्हणणे मांडावे. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून यशस्वी तोडगा काढू या, यासाठी अधिसभा सदस्य म्हणून सोबत राहील असे आवाहन शिवसेना नेते व अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. तसेच कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांनी परीक्षा पुढे ढकलली आहे. आंदोलकांचे हत्यार बनवत विद्यापीठाचा कारभार चालविणाऱ्या मंडळींनी  विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चालविला आहे, असेही विष्णू भंगाळे  यांनी म्हटले आहे. 

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,या ऑनलाईन परीक्षेचे प्राध्यापकांच्या सहकार्याने नियोजन सुरु आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा असल्याकारणाने अडचण येणार नाही असे वाटते. परीक्षा घ्यावी.  विद्यार्थी हित लक्षात घेता विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी  सहकार्य करावे. मागील भाजपच्या फडणवीस साहेबांच्या सरकारच्या काळात विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न का निकाली निघाले नाही ? याचे कारण देखील समोर आले पाहिजे. आता परीक्षा १ ऑकटोबर पासून सुरु होणार असताना  विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संघटनेने संप करण्याची वेळ योग्य नाही. कुलगुरू पी.पी.पाटील यांना प्रशासन योग्य पद्धतीने का हाताळता आले नाही ? असा परखड सवाल विष्णू भंगाळे  यांनी विचारला आहे.

कोरोनामुळे परीक्षेला बाधा आली होती. शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परीक्षेसंदर्भात योग्य भूमिका घेतली होती. मात्र भाजपप्रणित संघटनांच्या अट्टाहासापोटी आपण परीक्षांना सामोरे जात आहोत. आता विद्यापीठतील कारभार हाकणाऱ्यांनी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्याचे कामाला मदत करायचे सोडून आताच या  विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आंदोलनाला का बसविले ? त्यावेळी दिलेली आश्वासने व व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांनी त्यांना दिलेला शब्द फडणवीस सरकारच्या काळात का पाळला  गेला नाही ?  असा सवालही विष्णू भंगाळे  यांनी विचारला आहे. तसेच परीक्षा कुलगुरूंनी पुढे ढकलल्यामुळे विद्यापीठात कारभार हाकणारे मंडळी आंदोलकांना हत्यार बनवून वापरीत आहेत, असेही विष्णू भंगाळे यांनी म्हटले आहे. परीक्षा झाल्यानंतर आंदोलकांच्या सोबत मी राहील, अशी ग्वाही विष्णू भंगाळे यांनी दिली आहे.

 

Protected Content