स्वातंत्र्यदिनी प्रतिज्ञा घेण्याचे डाव्या पक्षांचे आवाहन

चोपडा प्रतिनिधी । आजच्या परिस्थितीत संविधानाचे रक्षण हेच लोकशाहीचे बळकटीकरण आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी संविधान आणि स्वातंत्र्याचे नाते अधिक बळकट करण्याचे आवाहन पाच डाव्या पक्षांनी संयुक्तपणे केले आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष,भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी लेनिनवादी(लिबरेशन),क्रांतिकारी समाजवादी पक्ष आणि अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक या पाच डाव्या पक्षांनी हे संयुक्तपणे आव्हान केले आहे.

याबाबत जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे की, जग कोविड१९चा सामना करीत असतानाच व भारतातही कोरोना महामारीचा विळखा जखडला जात असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत भाजपच्या केंद्र सरकारचे पाउले धर्मवादी राजकारण, खाजगीकरण व सरकारी संपत्तीचा लिलाव या बाजूने झपाट्याने पडत आहेत. धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, लोकशाहीमूल्य या संविधानातील तत्वाची उघडपणे पायमल्ली केल्या जात आहे. देशांमध्ये झपाट्याने धार्मिक ध्रुवीकरण केल्या जात आहे. मुस्लिम अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य बनवले जात आहे. तसेच जाती-धर्मांमध्ये देशाला पुन्हा विभागून टाकण्याचा खटाटोप केल्या जात आहे.

यात पुढे म्हटले आहे की, अनेक महत्त्वाचे निर्णय व कायदे संसदेमध्ये चर्चा न करताच अध्यादेशाद्वारे काढून लोकशाही मूल्यांची पूर्णपणे पायमल्ली केली जात आहे. न्यायव्यवस्था, सीबीआय, ईडी,निवडणूक आयोग ह्या देशांमध्ये स्वतंत्रपणे काम करणार्‍या संस्थांच्या कामकाजात हस्तक्षेप करून लोकशाहीच्या चौकटीला उध्वस्त केले जात आहे. परराष्ट्रविषयक धोरणात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरत असून भारताने यापूर्वी स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची भूमिका घेतली असून अमेरिका अथवा इतर देशापुढे भारत कधीही झुकला नाही. मात्र केंद्र सरकारचे धोरण अमेरिकेसारख्या साम्राज्यशाही देशापुढे झुकणारे आहे. भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकार विरुद्ध घेतलेली भूमिका ही देशाविरुद्ध घेतलेली भूमिका असे संबोधण्यात येऊन अनेकांना देशद्रोही ठरविण्यात येत आहे त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमान्वये खटले भरून तुरुंगात डांबण्यात आले आहे. यामुळे भारतीय राज्य घटनेच्या रक्षणासाठी भारतीय जनतेने एकत्र येण्याची गरज आहे.

यात पुढे नमूद करण्यात आले आहे की, भारतीय राज्यघटनेवर अभूतपूर्व हमला होत असून लोकशाही हक्क आणि नागरी स्वातंत्र्यावर देखील तीव्र हल्ला होत आहे. सर्व बाजूंनी भारतीय जनतेला कमजोर बनवून आत्मनिर्भर भारत असा नवा देखावा उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत जनतेने एकजूट करावी असे भाकप चे राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा,माकपचे सरचिटणीस सिताराम येचुरी, फॉरवर्ड ब्लॉक चे सरचिटणीस देबब्रत विश्‍वास, भाकप मालेचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य, क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे सरचिटणीस मनोज भट्टाचार्य यांनी आवाहन केले आहे.

महाराष्ट्रातील जनतेने या अभियानात बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे, राज्य कौन्सिल सदस्य अमृतराव महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Protected Content