Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरसोद जि.प शाळेत ‘हसत खेळत विज्ञान’ अंतर्गत प्रात्यक्षिकांसह व्याख्यान

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आज गुरुवार, दि. २८ सप्टेंबर रोजी धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या समन्वयातून क्षेत्रकार्य संस्था ग्रामपंचायत तरसोद आणि जिल्हा परिषद शाळा तरसोद येथे मराठी विज्ञान परिषद, जळगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हसत खेळत विज्ञानया अंतर्गत व्याख्यानासह प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

वैज्ञानिक प्रयोगासह व्याख्यान मराठी विज्ञान परिषदेचे सचिव तथा निवृत्त प्रा.दिलीप भारंबे यांनी केले. मार्गदर्शन करताना भारंबे म्हणाले की, “हल्लीच्या काळात प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने हसत खेळत विज्ञान समजूया या संकल्पनेतून  एकत्रित ३०० टाचण्यांवर १२० किलो वजनाचा माणूस एका पायावर उभे करणे, पाणबुडी, पेरीस्कोप, दोरीचा टेलीफोन, असे अनेक प्रयोग विद्यार्थ्यांना सांगितले. प्रयोगांच्या अंतिम टप्प्यात भारंबे यांनी चमत्कार वाटणाऱ्या प्रात्यक्षिकांमागील कार्यकारणभाव तथा वैज्ञानिक सत्य स्पष्ट केले.

प्रयोगात भारंबे यांनी विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेतल्याने विद्यार्थ्यांचे कुतूहल वाढून त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वर्धिष्णू झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोदा केंद्राचे केंद्रप्रमुख भगवान वाघे असून कार्यक्रमाचे संयोजक लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगावचे प्राचार्य डॉ.‌राकेश चौधरी, प्राध्यापक डॉ.यशवंत महाजन आणि प्रा. डॉ. निलेश शांताराम चौधरी असून प्रमुख अतिथी तरसोद जि.प. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुषमा पाटील, भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हा प्रमुख निवृत्त शिक्षक विजय लुल्हे उपस्थित होते.

कार्यक्रमास पदव्युत्तर समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी अंकिता अस्वार, शिवानी महाजन, प्रतीक काटे ,मनीषा काळे तसेच पदवी समाजकार्य  महाविद्यालय द्वितीय वर्षाचे विद्यार्थी साक्षी मोरे, पियुष त्रिभुवन, प्रणिता पवार, योगिता नांदे, अरिफ तडवी तसेच तृतीय वर्षाचे विद्यार्थी अनिरुद्ध भालेराव, महेश सुंभे, पुजा पवार, माधुरी गवळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी कार्यवाहीसाठी शाळेचे उपशिक्षक मनोहर बाविस्कर, निवृत्ती खडके, कल्पना तरवटे यांनी अमूल्य सहकार्य केले.

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद , केंद्रप्रमुख यांचे शाळेतर्फे प्रभारी मुख्याध्यापिका सुषमा पाटील यांनी बुके देऊन स्वागत केले. प्रस्तावनेत कार्यक्रमाची उद्दिष्टे केंद्रप्रमुख भगवान वाघे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना तरवटे व आभार प्रदर्शन सुषमा पाटील यांनी केले.

Exit mobile version