Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बेंडाळे महाविद्यालयात ‘रशिया-युक्रेन संघर्ष आणि जागतिक शांतता’ विषयावर व्याख्यान

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील संरक्षण व समरिकशास्त्र विभागातर्फे ‘रशिया – युक्रेन संघर्ष आणि जागतिक शांतता’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संरक्षण व समरिकशास्त्र विभागातील  सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुभान जाधव यांचे यावर  ऑनलाईन व्याख्यान पार पडले.

रशिया युक्रेन संघर्ष जगास नव्या शीतयुद्धाच्या दिशेने घेऊन जात तर नाही ना? असा प्रश्न यावेळी डॉ. सुभान जाधव यांनी उपस्थित केला. त्यांनी या संघर्षाचा परिणाम आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि मानवी सुरक्षेवर होत असून जागतिक राजकारण युरोपकडे जाताना दिसून येत आहे असे प्रतिपादन केले. सोबतच समाज माध्यमे या युद्धाचा अतिरंजितपण सर्वांपुढे आणत सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे. अमेरिका आणि युरोप प्रणित माध्यमे या युद्धाची युक्रेन व अमेरिकेची सकारात्मक बाजू दाखविताना दिसतात. रशियन माध्यमे युरोपमध्ये बाजूला पडलेली दिसून येतात. या संघर्षाचा परिणाम जगातील इतर राष्ट्रांमधील स्वातंत्र्य संघर्षावर होताना दिसतो. या संघर्षामुळे जागतिक स्तरावर शस्त्रास्त्र स्पर्धा, लहान शस्त्रास्त्रांची तस्करी इत्यादी बाबी वाढतांना दिसून येतात असे त्यांनी सांगितले. डॉ जाधव यांनी रशिया युक्रेन संघर्षाचा जागतिक शांतीच्या विविध पैलूंवर होणारा परिणाम विषद केला.

अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. जे. पाटील यांनी तर सुत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. गौरी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या सामाजिकशास्त्र व मास मीडिया  विभागातील प्राध्यापकांनी कार्य केले.

 

Exit mobile version