Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठात गांधी सप्ताहानिमित्त व्याख्यान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळे अंतर्गत महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्रामार्फत गांधी सप्ताहातील दुसऱ्या दिवशी “व्यसनमुक्ती पथनाट्य” व “गती घटाये जीवन बढाये” याविषयावरील व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.

दि. २ ते ६  ऑक्टोबर या दरम्यान गांधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत मंगळवार दि. ३ ऑक्टोबर रोजी विनोद ढगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यसनमुक्ती पथनाटय विद्यापीठात  सादर केले. त्यानंतर जेष्ठ सर्वोदयी डॉ.सुगन बरंठ यांनी गती घटाये जीवन बढाये या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे अध्यक्षस्थानी होते.  डॉ.बरंठ यांनी सांगितले की, भौतिक जगातील वाढत असलेल्या चुकीच्या जीवन पध्दतींवर आळा घालून पारंपरिक पध्दतीचा वापर करावा. भौतिक जगाच्या हव्यासापोटी असलेली आपल्या जीवनातील गती कमी करुन उत्तम दर्जाचे जीवन व्यतीत केले पाहिजे. या व्याख्यानात त्यांनी अनेक उदाहरणे दिली. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरे झाली. प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ.उमेश गोगडीया यांनी केले तर आभार प्रभारी संचालक डॉ.म.सु.पगारे यांनी मानले. सुत्रसंचालन डॉ.विजय घोरपडे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी प्रशाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Exit mobile version