Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्थायी समितीत पुन्हा प्रशासनाचे वाभाडे (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेच्या स्थायी समितीत सिटी कॉर्डीनेटर पदाची मुदत संपल्यानंतर प्रशासनाकडून आज प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावर प्रशासनावर सदस्यांकडून कडक ताशेरे ओढण्यात आले.

प्रशासनाने यापूर्वी देखील नियमबाह्य संविदा स्थायी समितीत ठेवल्या होत्या. प्रशासन लोकप्रतिनिधींना गृहीत धरत असल्याने सदस्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रशासन दप्तर दिरंगाई, नियम बाह्य कामे करत राहणार व लोकप्रतिनिधींनी लोक हित लक्षात घेऊन प्रस्तावांना मंजुरी द्यावी अशी अपेक्षा असते. का?, असा खरा वादाचा मुद्दा होता .

यापुढे असे कोणतेही प्रस्ताव मंजूर केले जाणार अशी सक्त सूचना देण्यात आली आहे. यापूर्वी सुद्धा प्रशासनाच्या नियमबाह्य संविदा सभापती हाडा यांनी नाकारल्या असून यासंदर्भात त्यांनी प्रशासनास लेखी कळविले आहे. सभापती हाडा यांनी ऑनलाईन महासभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. प्रशासन उडवा उडवीची उत्तरे व गोलमाल माहिती देत असल्याचा आरोप सभापती ऍड. शुचिता हाडा यांनी केला आहे.

प्रशासन वारंवर त्याच त्या चुका करीत असून कोणत्याही कामाची मुदत संपत असेल तर त्यापुढील प्रक्रिया प्रशासनाने राबवली पाहिजे. परंतु, प्रशासन याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचेही हाडा यांनी म्हटले आहे. सिटी कॉर्डीनेटरचे काम चांगले असल्याने त्यास मुदत वाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचेही सभापती ऍड. हाडा यांनी सांगितले.

आठवड्यातील २ दिवस मार्केट बंद ठेवण्यात येत असल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याने या निर्णयावर पुर्नविचार करावा अशी मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी केली. २ दिवस मार्केट बंदबाबत प्रशासनाच्या निर्णयाबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सोशल डिस्टन्सिंग राहावी याबाबतची भूमिका प्रशासनाने सभागृहात मांडली. यावर आमदार गिरीश महाजन यांनी आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीच्या वेळेस मनपा सभागृह खचाखच भरले होते. तेव्हा प्रशासनतर्फे कारवाई का करण्यात आली नाही ?, असा प्रश्न लढ्ढा यांनी उपस्थित केला. यावर इतर शहरांमध्ये आठवडाभर मार्केट सुरु असल्याने आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करावा अशी सूचना ऍड. सभापती हाडा यांनी केली.

शहरातील रस्ते खडीकरणाचा मुद्दा शिवसेनेचे विष्णू भंगाळे यांनी उपस्थित केला होता. मागील २ वर्षांपासून ३ कोटींचा खर्च रस्ता डागडुजीवर करण्यात आला आहे. मात्र हा ३ कोटींचा खर्च दिसत नसल्याचा आरोप श्री. भंगाळे यांनी केला. रस्त्यांची अवस्था जशी दोन वर्षांपूर्वी होती ती आजही कायम आहे. प्रश्न रस्त्याचा नसून तो त्यांच्या गुणवत्ते संदर्भातील असल्याचे नितीन लढ्ढा यांनी सांगितले. शास्त्रोक्त पद्धतीने संपूर्ण रस्त्यांचे नियोजनबद्ध आराखडा तयार करणे आवश्यक असते. रस्त्याचे निष्कृष्ट काम झाल्यास त्याबाबत जबाबदारी निश्चित करून त्यावर प्रशासनाने कारवाई करणे आवश्यक असल्याचे श्री. लढ्ढा यांनी सांगितले.

दरम्यान, महत्वाच्या विषयांवर चर्चा सुरु असतांना अधिकारी आपापसात गप्पा मारतात अशी तक्रार राजेश घुगे पाटील यांनी केली. तसेच शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी प्रश्न उपस्थित करत हा प्रश्न केव्हा सुटेल अशी विचारणा केली. यावर आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी यासंदर्भात नव्याने निविदा प्रक्रिया करावी लागेल अशी माहिती दिली.

 

Exit mobile version