राष्ट्रपती पदासाठी युपीएसह अन्य विरोधी पक्षप्रमुखांची आज बैठक

नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | युपीए आघाडीतील महत्वाच्या घटक पक्षाचे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपती पदासाठी नकार दिला आहे. त्यानंतर राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी युपीएसह अन्य विरोधी पक्षप्रमुखांची आज नवी दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.

राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच युपीए आघाडीसह विरोधकांचा सहमतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नाव सुचविले. परंतू पवार यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्या नावाची चर्चा असून काँग्रेस, शिवसेना तसेच तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येच्युरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा. आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांनी मंगळवारी शरद पवारांची त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती. यात सर्वसंमतीने पवारांच्या उमेदवारीला ‘आप’ चा देखील पाठिंबा असल्याचे संजय सिंह यांनी म्हटले होते. त्यानुसार विरोधकांचा सहमतीचा उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवण्यात आले.

परंतु पवारांनी हा पर्याय फेटाळला. यांनंतर नितीश कुमार व गुलाम नबी आझाद यांच्या नावाचीही चर्चा झाली. त्यापैकी आझाद यांच्यासाठी काँग्रेसचे अनुकूल असे मत नाही. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांचा संयुक्त उमेदवार ठरवण्यासाठी आज दिल्लीत युपीएसह अन्य विरोधी पक्षप्रमुखांची बैठक होत असून शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अन्य विरोधी पक्ष प्रमुखांसोबत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.
तृणमूल काँग्रेसच्या आक्रमकतेवर काँग्रेस, माकप, द्रमुक आदी पक्षांची नाराजी
राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असतानाही तृणमूल काँग्रेसने वेगवान हालचाली करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, द्रमुक, आप, शिवसेना यांच्यासह अन्य प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहित दिल्लीमध्ये बुधवारी कॉन्स्टिटय़ुशन क्लबमध्ये होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते.

तृणमूल काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेवर काँग्रेस, माकप, द्रमुक आदी पक्षांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे हे पक्ष बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नसली तरी काँग्रेसने मात्र ममतांच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. यात काँग्रेसच्या वतीने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Protected Content