Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरु (व्हिडीओ)

vidyapith uposhan

जळगाव, प्रतिनिधी | येथील विधी महाविद्यालयाच्या काही विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांसाठी कालपासून (दि.२०) विद्यापीठाच्या प्रवेश द्वाराजवळ आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाची दखल आजपर्यंत विद्यापीठ प्रशासनाने घेतलेली नाही. दरम्यान या उपोषणाबद्दल आपणास संबंधित विद्यार्थ्यांनी कुठलीही कल्पना दिली नसल्याची माहिती कुलगुरुंनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना दिली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, उपोषणकर्त्या विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या मागण्यांसाठी यापूर्वी अनेकदा कुलगुरुंना भेटून माहिती दिली होती. त्यावर कुलगुरुंनी त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही यंदाच्या निकालात त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आल्याने नाईलाजाने त्यांना हा आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला आहे.

या विद्यार्थ्याच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. १) २०१८-१९ सालच्या निकालात विद्या परिषद सभेचा ठराव लागू करावा, २) कुलगुरुंनी तोंडी आश्वासन दिल्याप्रमाणे ४०-४० गुणांचा पासिंगचा ठराव सगळ्यांना लागू करावा, ३) विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना ४० चे पासिंग व ४० मार्कांचेच अग्रीगेट पासिंग लागू करावे, ४) ए.टी.के.टी. ची सवलत तीन ऐवजी चार विषयांसाठी करण्यात यावी आदी.

उपोषण बेकायदेशीर-कुलगुरू
याबाबत ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने कुलगुरू डॉ. पाटील यांच्याशी संपर्क केला असता, “विद्यार्थ्यांनी आमच्याशी कोणताही संपर्क न करता, थेट पाळधी पोलिसांना निवेदन दिले असून पोलिसांकडून आम्हाला त्याबाबत माहिती मिळाली आहे, असे म्हटले. डायरेक्टर बॉडी यासंदर्भात तात्काळ मीटिंग घेऊन, त्यानुसार त्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी आम्हाला काहीही न कळवता उपोषण केल्याने, हे उपोषण कायदेशीर आहे. असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

 

 

Exit mobile version