Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपच्या ओबीसी जागर अभियानास प्रारंभ

मुंबई प्रतिनिधी | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी जागर अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. याच्या उदघाटनप्रसंगी फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

भाजपाकडून राज्यात ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. “ सरकार आल्यानंतर या सरकारला राज्य मागासवर्ग आयोग गठीत करायचा होता आणि इम्पेरिकल डेटा जमा करायचं परिपत्रक काढून सर्वोच्च न्यायालयाला द्यायचं होतं. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला पाहिजे तितका वेळ दिला असता. या सरकारनं १५ महिने वाया घालवले. सात वेळा तारखा घेतल्या आणि कोणतीच हालचाल केली नाही. मार्चमध्ये सरकारनं एक प्रतिज्ञापत्र  दाखल केलं आणि सांगितलं आमच्या काही जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांच्या वर राजकीय आरक्षण आहे. या संदर्भात कोर्टाने निर्णय घ्यावा. सुप्रीम कोर्टानं निकाल देताना सांगितलं या सरकारनं आम्ही दिलेल्या निर्देशांचं पालन केलं नाही. या सरकारने फक्त वेळेकाढूपणा केला. सरकारला सांगूनही राज्य मागसवर्गीय आयोग गठीत केला नाही. कोणतीच हालचाल करण्याची सरकारची मानसिकता नाही. त्यामुळे कोर्टानं राज्यातील ५० टक्क्यांच्या आतलं सर्व राजकीय आरक्षण रद्द केलं. तसेच हे काम जिथपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत राजकीय आरक्षण देता येणार असा निर्णय दिला”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

सरकारच्या वेळकाढूपणामुळे राज्यातील ओबीसी आरक्षण गेलं अशा निशाणा त्यांनी साधला. ओबीसींचं संपूर्ण आरक्षण संपवण्याचं काम या सरकारनं केलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. “ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न हा महत्वाचा झाला आहे. रोज खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रकारे महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात. नेते कमी बोलतात कारण त्यांना माहिती आहे. आपल्या चुकीमुळे राजकीय आरक्षण गेलं आहे. त्यामुळेच त्यांचे बोलके पोपट बोलत आहेत. त्यांचे मालक जसं सांगत असतात तसं ते बोलत असतात.”, अशी जोरदार टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Exit mobile version