Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोकशाही आणि संविधान वाचविण्याची शेवटची संधी – सुप्रसिद्ध वक्ते निरंजन टकले

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकशाही आणि संविधान वाचविण्याची शेवटची संधी आहे. लोकशाही, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, बंधुता टिकविण्यासाठी आपल्यालाच प्राणपणाने लढावे लागेल. लोकशाहीची लढाई आपण नक्कीच जिंकू असा विश्वास सुप्रसिद्ध वक्ते निरंजन टकले यांनी १८वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात व्यक्त केला.

असत्याबद्दल सत्य कथन: स्वातंत्र्य संविधान देशभक्ती राष्ट्रवाद संस्कृती आणि बरेच काही या विषयावर विशेष व्याख्यानातून पत्रकार निरंजन टकले यांनी उपस्थित हजारो श्रोत्यांना भविष्यातील धोक्याबद्दल जागरूक करतांना देशातील विस्फोटक परिस्थिती लक्षात आणून दिली. प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले ते आपण वापरायचं आहे. देशात जे चाललय ते योग्य आहे का ?असा प्रश्न विचारला पाहिजे. संविधानाने मी पासून आम्ही पर्यंतचा पल्ला गाठला, संविधानाने मला हक्काची आणि अधिकाराची जाणीव करून दिली.मी राष्ट्रप्रेमाला अधिक महत्व देतो,तथाकथित राष्ट्रवाद संकल्पना बदमाशी आहे. देशाच्या महिला राष्ट्रपतींना उदघाटनासाठी बोलावलं जात नाही.यामागे महिलांना अपमानित करणेचा हेतू आहे. प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य संविधानाने आम्हाला दिल.

नवीन न्याय संहिता निर्माण होत आहे, आर्थिक धोरणावर टीका केल्यास जेल मध्ये टाकू अशी धमकी दिली जाते तसे कायदे अस्तित्वात येत आहेत. लोकशाही धर्म व संविधान हाच आमचा धर्मग्रंथ आहे. ते टिकविण्यासाठी आम्ही तयार असलं पाहिजे, असे आवाहन निरंजन टकले यांनी केले. सूत्रसंचालन स्थानिक अध्यक्ष गौतम मोरे यांनी केले.आभार संयोजक प्रा.लीलाधर पाटील यांनी मानले. स्वागत प्रशांत निकम यांनी केले. तर याप्रसंगी मंचावर विद्रोहीच्या राज्याध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी, मुख्य समन्वयक प्रा.अशोक पवार, निमंत्रक रणजित शिंदे उपस्थित होते.

Exit mobile version