लसींची कमतरता पडू देणार नाही : ना. गुलाबराव पाटील

 

जळगाव प्रतिनिधी | कोरोनाच्या प्रतिकारासाठी लसीकरण खूप महत्वाचे असून जिल्ह्यात कालच एक लाख लसींचा डोस उपलब्ध झाला असून लवकरच तीन लाख व्हॅक्सीन्स मिळणार आहेत. यामुळे जिल्हा प्रशासन योग्य नियोजन करून प्रत्येकाला लस उपलब्ध करणार आहे. तर नागरिकांनी कोणताही गर्दी न करता लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील म्हसावद येथील लसीकरण केंद्राला भेट दिल्यानंतर ते थेपडे हायस्कुल प्रांगणात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

जळगाव जिल्ह्यात लसीकरणाला आता खूप वेग आला आहे. मध्यंतरी लसींच्या उपलब्धतेत अडचणी होत्या. मात्र काल रात्रीच लसींचे डोस उपलब्ध झाल्याने आज जिल्हाभरात वेगाने लसीकरण झाले. या अनुषंगाने आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तालुक्यातील म्हसावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच थेपडे विद्यालयातील लसीकरण केंद्राला भेट दिली. त्यांनी लसीकरणासाठी आलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधून आरोग्य कर्मचार्‍यांकडून लसीकरणाबाबतची माहिती जाणून घेतली.

या भेटीनंतर आयोजित कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. नियमांचे पालन आणि लसीकरण या बाबी तिसर्‍या लाटेच्या प्रतिकारासाठी महत्वाच्या आहेत. यात लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने अचूक नियोजन केलेले आहे. मध्यंतरी लसींचा पुरवठा कमी-जास्त प्रमाणात होत असल्याने लसीकरणावर याचा परिणाम होत होता. तथापि, आता नियमीतपणे लसी येत आहेत. कालच एकाच वेळेस एक लाख लसी आल्या असून त्या आज दिवसभरात देण्यात येणार आहेत. तर पुढील आठवड्यात तीन लाख लसी येणार आहेत. सध्या जिल्ह्यात सुमारे १४ लक्ष २१ हजार नागरिकांचे लसीकरण झाले असून लवकरच हा आकडा २० लाखांवर जाणार असल्याची माहिती देखील पालकमंत्र्यांनी दिली.

लसींच्या उपलब्धतेनुसार जिल्हा प्रशासना लसीकरणाचे नियोजन करत आहे. प्रत्येकाला लस मिळणार असल्याने कुणी घाई-गडबड करू नये. विशेष करून लसीकरण केंद्रांवर गर्दी करणे टाळावे, जेणेकरून कोरोनाला आमंत्रण मिळणार नाही अशी अपेक्षा देखील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केली. तर लस वाया जाऊ न देण्याचे निर्देश देखील त्यांनी आरोग्य कर्मचार्‍यांना केले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे पंचायत समिती उपसभापती पती समाधान चिंचोरे, सरपंच गोविंद पवार , उपसरपंच शितलताई चिंचोरे, संगोयो योजनेचे तालुकाध्यक्ष रमेशआप्पा , डॉ.एन. आर.अग्रवाल, एस.जी.नाशिककर, पाटील , डॉ. पी .आर. गर्ग, मुख्याध्यापक सोनार सर, रवी कापडणे, धेर्यसिंग पाटील, सुधाकर मराठे, इंदल परदेशी, बापू धनगर,प्रवीण पाटील, विकी चव्हाण, विजय आम्ले, सुनील बडगुजर, नारायण पाटील, सुनिल मराठे, अहमद शहा महेंद्र चिंचोरे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य शिवसेना व युवासेना युवा सेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. योगीराज चिंचुर यांनी केले तर आभार जी. डी.बच्छाव सर यांनी मानले

Protected Content