Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॅपटॉप चोरीप्रकरणी आरोपीस तीन महिन्याची शिक्षा

जळगाव प्रतिनिधी ।लॅपटॉपसह इतर सामान चोरी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात संशयिताला दोषी ठरवून न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा तसेच एक हजार रूपये दंडाचा निकाल न्या. जी.जी.कांबळे यांनी गुरुवारी दिला.

याबाबत माहिती अशी की, 8 मे 2012 रोजी मध्यरात्रीनंतरगोलाणी मार्केटमधील दुसर्‍या मजल्यावरील जी विंग गाळा क्रमांक 31 मध्ये राजेश वाणी अ‍ॅण्ड कंपनी या कार्यालयाचे शटरचे कुलूप कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने एक लॅपटॉप, की बोर्ड, चार्जर बॅगसह चोरून नेला होता. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुरन 56/12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासचक्रे फिरवून संशयित मंगल साळुंखे (वय-19) रा.गेंदालाल मिल याला अटक करून तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्या.जी.जी.कांबळे यांच्या न्यायालयात खटल्याच्या चौकशीत सरकार पक्षातर्फे मुळ फिर्यादी राजेंद्र वाणी, सुनील महाले, योगेश वैष्णव, विनोद वानखेडे, तपासाधिकारी तथा हेड कॉन्स्टेबल आनंदसिंग पाटील यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. पुराव्यानुसार न्यायालयाने संशयितास दोषी धरून भादंवि कलम 380 अन्वये तीन महिने साधी कैद तसेच एक हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास 15 दिवसांची शिक्षेची तरतुद केली आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. आशा शर्मा यांनी कामकाज पाहिले.

Exit mobile version