किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा अपहार

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीत ग्रामसेवक, सरपंच व सदस्यांनी खोटी बिले दाखवून लाखो रूपयांचा अपहार केला असून संबंधितांवर न्यायालयात खटला दाखल करण्याची परवानगी तक्रारदार युवराज सोनवणे आणि रामचंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे केली आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील ग्रामपंचयतीला १४व्या वित्त आयोगान्वये निधी प्राप्त झाला होता. ३ सप्टेंबर २०२० रोजी ग्रामसेवक प्रदीप धनगर, सरपंच टिकाराम मुरलीधर चौधरी आणि इतर सदस्यांनी गावात निकृष्ठ प्रतीचे काम केली. तर या कामाचा निधी वर्ग करण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक करून प्रत्येकी ९९ हजार ९०० रूपयाचा पहिला निधी,  १ लाख ९९ हजार ५५१ रूपयांचा दुसरा निधी आणि ३ लाख ९९ हजार ९२३ रूपयाचा तिसरा निधी असा एकुण ६ लाख ९९ हजार ३७४ रूपयांचा अपहार केला आहे. यासंदर्भात तक्रारदार युवराज समरत सोनवणे रा. यावल आणि रामचंद्र दाजीबा पाटील रा. किनगाव ता. यावल यांनी तत्कालिन तहसीलदार कुवर यांच्याकडे अपहार झाल्याची तक्रार दिली होती. तहसीलदारांनी  चौकशी न करता गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी कोरोनाचे कारण सांगून चौकशीला टाळाटाळ केली व अपहार करणाऱ्यांना पाठीशी घातले. अश्या गैरकारभार करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांची वरिष्ठ पातळीवर तक्रारी दाखल करण्यात आले. 

किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत बोगस कामे करून बनावट व खोटी कागदपत्रे तयार करून शासनाची लाखो रूपयांची फसवणूक करणाऱ्या तहसीलदार कुंवर, ग्रामविकास अधिकारी प्रदीप धनगर, सरपंच टिकाराम चौधरी, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समितीचे अभियंता आर.पी. इंगळे यांच्याविरोधात न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी तक्रारदार युवराज सोनवणे आणि रामचंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

Protected Content