Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुसुंबा येथील ठेकेदाराचा विहिरीत पडून मृत्यू; एमआयडीसी पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथे विहिरीत ३२ वर्षीय ठेकेदाराचा पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

अधिक माहिती अशी की, अवधूत गंभीर पाटील (३२) या तरूण ठेकेदाराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अवधूत हा विहिरीत पडला होता. मात्र, त्याचा मृतदेह मिळून येत नव्हता. अखेर मंगळवारी ग्रामस्थ व अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टीमच्या शोधकार्याला यश येवून दुपारी बारा वाजेच्या सुमारास मृतदेह विहिरीत आढळून आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्‍यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथे गंभीर पाटील हे कुटूंबासह वास्तव्यास होते. ते जळगाव टोलनाक्याजवळ असलेल्या किरण मशीन टूल्स येथे लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करीत होते. सोमवारी घरून जेवण केल्यानंतर ते बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्रांना फोन करून सुमारे तीन वाजता कुसूब्यातील एका शेतात असलेल्या विहिरीजवळ बोलावून घेतले होते. मित्र त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच अवधूत हा विहिरीत पडला होता. 

शोधाशोध सुरू…

अवधूत हा विहिरीत पडल्याचे कळताच लागलीच त्याचा विहिरीत शोध घेणे ग्रामस्थांनी सुरू केले होते. दुस-या दिवशी मंगळवारी सुध्‍दा ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टीममधील प्रकाश चव्हाण, देविदास सुरवाडे, रवींद्र बोरसे, प्रदीप धनगर आदींनी अवधूत याच्या मृतदेहाचा विहिरीत शोध घेतला. अखेर दुपारी बारा वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला. नंतर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुपारी नेण्यात आला होता. अवधूत पाटील यांच्या पश्चात आई-वडील आणि विवाहित बहीण आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात डॉ. रेणूका भंगाळे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्‍यात आली आहे. दरम्यान, विहिरीवर बसला असते, त्यावेळी तो विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्‍यात आला आहे.

 

Exit mobile version