कुसंग, व्यसन, सिनेमामुळे युवावर्ग बिघडला – भगवानभाई

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आजचा युवावर्ग हा उद्याचा भावी समाज आहे. परंतु आजच्या युवा वर्गाला कुसंग, व्यसन, सिनेमा याची किड लागल्यामुळे युवावर्ग बिघडत चालला असल्याचे प्रतिपादन माउंट आबू राजस्थान येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे राजयोगी ब्रम्हकुमार भगवानभाई यांनी केले.

ते बुरहानी इंग्लिश मीडियम, नवजीवन विद्यालय आणि उच्च माध्यमिक कन्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांशी ‘जीवनामध्ये नैतिक शिक्षणाची गरज’ या विषयावर संवाद साधत होते. त्यांनी सांगितले की, “आजच्या सामाजिक सर्व समस्यांचे मूळ कारण म्हणजे नैतिक मूल्यांची कमतरता आहे. समाजामध्ये जाण्याच्या पूर्वी भौतिक शिक्षणाबरोबर नैतिक शिक्षण घेणे सुध्दा गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी नैतिक शिक्षणाचा पाठ शिकला नाही तर मग शिक्षण घेऊनसुध्दा जीवन अंधकारमय राहिल, असे म्हणायला काही हरकत नाही. जीवनाला सुखमय बनवायचे असेल तर मग नैतिक शिक्षण गरजेचे आहे. असे ते म्हणाले.

अखिल भारतीय नैतिक शिक्षणाच्या अभियानाचे उद्देश स्पष्ट करून त्यांनी ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाबद्दल माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक म्हणाले की, “आजचे विद्यार्थी उद्याचा समाज आहे, उद्याचा समाजाला चांगले बनविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये नीतीमत्ता असणे गरजेचे आहे. स्थानिक राजयोग सेवाकेंद्राच्या ब्रह्मकुमारी नंदा बहनने सुध्दा मुलांना आपल्या शुभ भावना अर्पित केल्या. या कार्यक्रमामध्ये बी. के. विष्णुभाई, बी. के. रामदास भाई, बी. के. गणेश भाई उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी राजयोगचा अभ्यास करण्यात आला.

Protected Content