Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुलभूषण जाधव यांना आज मिळणार दुतावासाची मदत

kulbhushan jadhav 0

मुंबई वृत्तसंस्था । कुलभूषण जाधव प्रकरणी भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना आज दि. 2 सप्टेंबर सोमवारी व्हिएन्ना कॉन्व्हेन्शन, आयसीजेचा निकाल आणि पाकिस्तानच्या कायद्याच्या अनुषंगाने भेटण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली.

याबाबत माहिती अशी की, परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते महंमद फैजल यांनी ही माहिती दिली. व्हिएन्ना करारानुसार आणि पाकिस्तानी कायद्यानुसार कुलभूषण जाधव यांना भारतीय अधिकाऱ्यांना भेटू दिले जाणार आहे. याआधीही पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी दिली होती. मात्र ही भेट थेट नव्हती. यात अडथळे होते. त्यामुळे भारताने अशा स्वरूपाची भेट नाकारली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही अटींशिवाय दूतावासाची मदत (कॉन्स्युलर अॅक्सेस) मिळवून द्यावी, असे भारताने पाकिस्तानला सांगितले आहे. जाधव यांना दूतावासाची मदत देण्यासाठी पाकिस्तानने भारतासमोर जाधव आणि भारतीय अधिकाऱ्यांची भेट होईल त्याठिकाणी पाकचा एक अधिकारी उपस्थित राहील, भेटीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील आणि भारतीय अधिकारी आणि जाधव यांच्यात होणारी चर्चा रेकॉर्ड केली जाईल, अशा अटी ठेवल्या होत्या. भारताने त्या मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला होता. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना कथित हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपांखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितल्यानंतर या शिक्षेला स्थगिती मि‌ळाली होती. ‘जाधव यांच्या खटल्याचा आणि शिक्षेचा आढावा घेऊन या प्रकरणी फेरविचार करावा आणि त्यांना विनाविलंब भारतीय दूतावासाची मदत देण्यात यावी,’ असे आदेश न्यायालयाने पाकिस्तानला १७ जुलै रोजी दिले होते.

Exit mobile version