कोराना योध्द्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य – पंतप्रधान

नवी दिल्ली वृत्तसंस्था । सरकारी नोकरीत कोविड योध्द्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याची महत्वाची घोषणा पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाने केली आहे. यासोबत नीट-पीजी परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

 पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार नीट-पीजी परीक्षा किमान 4 महिने पुढे ढकलण्यात येणार आहे. या निर्णयानुसार, एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी तैनात करण्यात येईल. बीएससी (नर्सिंग), जीएनएम पास परिचारिकांची सेवा वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली पूर्णवेळ नर्सिंग ड्यूटीसाठी लावण्यात येईल, असे पीएमओ कडून सांगण्यात आले. यासह कोरोना ड्युटीचे 100 दिवस पूर्ण केलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आगामी सरकारी नोकर भरतीत प्राधान्य देण्यात येईल.

कोविड रुग्णांच्या सेवेत 100 दिवस काम पूर्ण करणारे वैद्यकीय कर्मचारी यांना पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कार देण्यात येईल. याद्वारे त्यांना शासकीय भरतीत प्राधान्य दिले जाईल.  ड्युटीवर असणार्‍या वैद्यकीय विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने लस दिली जाईल. या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांच्या सेवेत असलेल्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच केंद्राच्या विमा योजनेत समाविष्ट केले जाईल. पीजी विद्यार्थ्यांच्या नवीन बॅच जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत अंतिम वर्षाच्या पीजी विद्यार्थ्यांना सेवेत वापरले जाऊ शकते.

Protected Content