आतून आवाज आला तरच उद्योजक बना- किशोर ढाके (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कुणीही मारून मुटकून व्यापार वा उद्योगात यशस्वी होत नाही, तर यासाठी आतून आवाज येणे गरजेचे असते असे प्रतिपादन येतील सोयो सिस्टीमचे कार्यकारी संचालक तथा प्रतिथयश उद्योजक किशोर ढाके यांनी केले. ते लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

लाईव्ह ट्रेंडस् न्यूज समाजातील विविध क्षेत्रांमधील यशस्वी मान्यवरांच्या वाटचालीचा आढावा आपल्यासमोर मांडणार आहोत. यात पहिल्यांदा सोयो सिस्टीमचे कार्यकारी संचालक किशोर ढाके यांच्याशी साधलेला संवाद आपल्याला सादर करत आहोत.

किशोर ढाके हे मूळचे भालोद (ता. यावल) येथील रहिवासी. येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. यानंतर त्यांनी मुंबई येथून इलेक्ट्रॉनिक्स या विषयात बी.टेक.ची पदवी संपादन केली. खरं तर शिक्षणानंतर बहुतांश जण नोकरीला प्राधान्य देतात. मात्र किशोरजींना बालपणापासूनच आपला स्वत:चा व्यवसाय अथवा उद्योग असावा असे वाटत होते. त्यांच्या घराण्यात याचा वारसा नसतांनाही ये क्षेत्र त्यांना खुणावत होते. यामुळे बी.टेक. होऊन त्यांनी एका कंपनीत सहा महिने ट्रेनी म्हणून काम केले. यानंतर ते १९९२ साली जळगाव येथे आले. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांनी विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या दुरूस्तीचे काम सुरू केले. तेव्हा जळगावात प्लास्टीक व चटई उद्योग भरभराटीस होता. ढाके यांनी त्यांची प्रारंभी रिपेअरींग केली. यानंतर ते स्वत: उपकरणे बनवू लागले. दरम्यान, सोयो या त्यांच्या ब्रँडची जन्मकथादेखील खूप विलक्षण आहे. त्यांना सोनी आणि सॅनयो हे दोन ख्यातप्राप्त ब्रँड ज्ञात होते. या दोन्ही ब्रँडमधील पहिले व शेवटचे अक्षर घेऊन त्यांनी सोयो हे नाव घेतले. पहिल्यांदा तर त्यांना हा आपला ब्रँड बनेल असे वाटलेदेखील नव्हते. मात्र पैशांच्या चलनासाठी याचा वापर होऊ लागला. यातून सोयो सिस्टीम्स हे नाव आकारास आले. त्या काळात जळगाव औद्योगिक वसाहतीमधील सुमारे २५० ते ३०० कंपन्यांची कामे त्यांना मिळाली. यातच फक्त सर्व्हीस देत असतांना काही उपकरणे बनविण्यास प्रारंभ करण्यात आला. यामुळे सोयो सिस्टीमचे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणून रजिस्ट्रेशन करण्यात आले. यानंतर त्यांच्या आयुष्यात एक टर्नींग पॉइंट आला. जळगावातील एका पोलीस अधिकार्‍याने त्यांना शहरातील सिग्नल यंत्रणेचे काम दिले. या कामाचा चांगलाच विस्तार आला. त्यांना राज्यभरातील अनेक नगरपालिकांची कामे मिळाली.

हे सारे होत असतांना १९९९च्या सुमारास लोडशेडींगची समस्या सुरू झाली. यामुळे युपीएस/इन्व्हर्टरच्या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले. खरं तर ते आधीपासूनच लहान इन्व्हर्टर तयार करत असल्याने त्यांना याचा अनुभव होता. यातून सोयो सिस्टीमने इन्व्हर्टर, युपीएस आणि बॅटरीजच्या व्यवसायात पदार्पण केले. आणि यानंतर काय झाले तो इतिहास आपल्यासमोर आहेच. सोयो हा इन्व्हर्टरमधील अग्रेसर ब्रँड बनला. सुमारे एक दशकांपर्यंत जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील तब्बल ३५ हजार ग्राहकांना जोडण्यात किशोर ढाके यांना यश आले. दरम्यान, २००८ पासून भारनियमन कमी होण्याची चिन्हे दिसून आल्यानंतर त्यांनी सौर उर्जेच्या क्षेत्रात पदार्पण केले. सोयोने अतिशय दर्जेदार उत्पादने देतांना तितक्याच तोलामोलाची विक्रीपश्‍चात सेवा प्रदान केली. यामुळे एक ब्रँड म्हणून सोयो नावलौकीकास आला.

दरम्यान, थेट ग्राहकांसोबतच्या व्यवसायाने प्रगती झाली तरी याच्या मर्यादादेखील किशोर ढाके यांच्या लक्षात आल्या. यामुळे त्यांनी ही बाजू कायम ठेवत शासकीय कामे घेण्यास प्रारंभ केला. यात प्रारंभी खूप अडचणी आल्या. मात्र पाच-सहा वर्षांमध्ये यात स्थिरावल्याचे ते म्हणाले. आता त्यांना ई-वाहनांचे क्षेत्र खुणावू लागले आहेत. यामुळे आता त्यांनी लिथीयम बॅटरीजच्या निर्मितीत पदार्पण केले आहे. सध्या तरी ई-वाहनांची निर्मिती करणार की नाही हे त्यांनी ठरविलेले नाही. मात्र बॅटरीजच्या क्षेत्रात ते निश्‍चित उतरणार आहेत. याशिवाय, आता त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठही खुणावू लागली आहे. आपला व्यवसाय ग्लोबल पातळीवर नेण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला आहे. तरूणाईला संदेश देतांना ते म्हणाले की, नोकरीत एक प्रकारची मर्यादा आहे. यामुळे उद्योग वा व्यापारात निश्‍चित यावे. मात्र कुणालाही मारून-मुटकून उद्योजक करता येत नाही. यासाठी आतून आवाज येणे आवश्यक असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले. विशेष बाब म्हणजे पैसे नसले तरीही उद्योग सुरू करता येत असल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले. विशेष करून तंत्रज्ञानामुळे अशा प्रकारच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे किशोर ढाके म्हणाले.

पहा– किशोर ढाके यांच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content