हसन मुश्रीफ यांचा पुन्हा नवीन घोटाळा : सोमय्यांचा आरोप

कराड | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १०० कोटी रूपयांचा नवीन घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. कोल्हापूरला जाण्याआधी कराड येथे उतरवल्यानंतर सोमय्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. यात त्यांनी आता पुढील टार्गेट हे मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार असल्याचेही स्पष्ट केले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्र्रीफ यांनी १२७ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी या संदर्भात ईडीला २७०० पानांचे कथित लेखी पुरावे सुध्दा दिले आहेत. तर याच प्रकरणात कागल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यासाठी आपण कोल्हापूर जिल्ह्यात जाणार असल्याची घोषणा किरीट सोमय्या यांनी केली होती. मात्र कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना जिल्हाबंदी केली. हे निर्देश धुडकावून लावत सोमय्या काल रात्री कोल्हापूरला निघाले. मात्र याआधीच सातारा जिल्ह्यातील कराड येथे त्यांना ट्रेनमधून उतरवण्यात आले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारबाबत घणाघाती टीका केली.

सोमय्या म्हणाले की, काल मला मुंबई पोलिसांनी सहा तास घरात कोंडून ठेवले. मी त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांचे लेखी आदेश मागितल्यानंतर मात्र ते देऊ शकले नाहीत. यानंतर आपल्याला कराडच्या आधी सातारा पोलीस अधिक्षकांनी आदेश दाखवून कराड येथे उतरवले असे ते म्हणाले. यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, हसन मुश्रीफ यांचे जावई हे ब्रिक्स इंडिया लिमिटेड या कंपनीचे बेनामी मालक आहेत. ही कंपनी आणि सरसेनापती कारखान्यामध्ये ५० कोटीची आर्थिक उलाढाल झाली आहे. या कंपनीत आलेले पैसे अपारदर्शक पद्धतीने आले आहेत. या व्यवहाराबद्दल काहीही माहिती नाही. एकूण १०० कोटींचा हा घोटाळा आहे. मुश्रीफ यांचा हा दुसरा घोटाळा असून एका आठवड्यात तिसरा घोटाळा काढणार असल्याचा इशारा देखील किरीट सोमय्या यांनी दिला. तर रश्मी ठाकरे यांच्या जमीनीची खरेदी आणि अजित पवार यांच्या साखर कारखाना खरेदीतील सहभाग याबाबत आपण पुढील आठवड्यात पाहणी करणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

पुढच्या सोमवारी 27 तारखेला उद्धव ठाकरे साहेबांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये 19 बंगल्यांचा घोटाळा केलाय, त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. उद्धव ठाकरेंची दडपशाही सुरु असल्याचाही आरोप सोमय्यांनी केला आहे. 30 तारखेला अजित पवारांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतला, त्याची पाहणी करणार. मला रोखणार आहे का?, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

Protected Content