Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीस समजून शिक्षकाची हत्या; नक्षलवाद्यांनी माफी मागितली

naxal attack

गडचिरोली (वृत्तसेवा) दहा दिवसांपूर्वी कोरची तालुक्यातील ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात नक्षल्यांनी योगेंद्र मेश्राम या कला शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली होती. मात्र, पोलिस समजून चुकीने त्याची हत्या झाल्याचे सांगून नक्षल्यांनी मेश्राम यांच्या कुटुंबीयांची आता माफी मागितली आहे. दरम्यान, बोटेझरी येथील कंत्राटी आरोग्य सेविका कस्तुरबा चंदू देवगडे हिचे पती योगेंद्र मेश्राम हे गडचिरोली नगर परिषदेच्या जवाहरलाल नेहरु विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते. दर शनिवारी ते पत्नीकडे यायचे. 10 मार्चला ते ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात गेले होते. ही संधी साधून नक्षलवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

 

या घटनेनंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) उत्तर गडचिरोली डिव्हीजनल कमिटीचा सचिव पवन याने एक पत्र जारी केले आहे. योगेंद्र मेश्राम हे दोषी नव्हते. मेश्राम परिवार आमचे टार्गेट नव्हते. आमच्या गुप्तचर यंत्रणेच्या चुकीमुळे पोलीस समजून दुर्भाग्याने त्यांची हत्या झाली. मेश्राम कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी असून, आम्ही या घटनेबाबत आपली माफी मागतो. ही घटना आमची चूक आणि मोठी कमजोरी असल्याचेही पवनने म्हटले आहे. समस्त जनता, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, व्यापारी व पत्रकारांचीही आम्ही माफी मागत असल्याचे पवने पत्रकात म्हटले आहे.

Exit mobile version