सिध्दू मुसेवालाच्या मारेकर्‍याला अटक

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गायक तथा काँग्रेसचे पदाधिकारी सिध्दू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी शार्प शुटर संतोष जाधव याला बेड्या ठोकल्या आहेत.

पंजाबमधील जवाहरके या गावात २९ मे रोजी मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. यात लॉरेन्स बिष्णोई टोळीचा हात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. मुसेवालावर गोळ्या झाडणार्‍या दहा हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून यात मंचरमधील गुंड संतोष जाधव आणि त्याचा साथीदार सौरभ महाकाल यांचा हात असल्याची बाब काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. यापैकी सौरभ महाकालला काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. यानंतर आता पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने संतोष जाधवला गजाआड केले आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधून संतोषला ताब्यात घेतलं आहे. रविवारी रात्री उशीरा त्याला पुण्यातील जिन्हा न्याय दंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात आलं. त्याला २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुसेवाला प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असून संतोष जाधव हा देखील ताब्यात आल्याने या प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.

Protected Content