Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खुशखबर : यंदा सीबीएसईची दहावी-बारावीची परिक्षा होणार सोपी

नवी दिल्ली (वृत्तसेवा) सीबीएसईची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी काठिण्य पातळीच्या दृष्टीने अवघड समजली जाते. त्यातच यावर्षी सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन आठवडे लवकर सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर काहीसे दडपण आले आहे. मात्र असे असले तरी या परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थी आणि पालकांसाठी सीबीएसईने एक मोठी खूशखबर दिली आहे. यावर्षी सीबीएसईच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काही प्रमाणात बदलण्यात आले आहे. त्यामुळे सीबीएसईचे यावर्षीचे पेपर गतवर्षांच्या तुलनेत काही प्रमाणात सोपे असणार आहेत. सीबीएसईची दहावी आणि 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

 

आजवर प्रश्नपत्रिकांमध्ये १० टक्के वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जात होते. मात्र, आता यात वाढ करुन ते २५ टक्के करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा परिक्षा देताना आत्मविश्वास वाढेल तसेच त्यांना परिक्षेत अधिक गुणही मिळवता येतील असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत शंका असेल किंवा त्याला उत्तर येत नसेल तर त्याच्याकडे ३३ टक्के जास्त प्रश्न उपलब्ध असतील. मात्र, यंदा विद्यार्थ्यांना विविध प्रकारे उत्तरे लिहीता येतील असे अधिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रत्येक पेपरला उपविभागांमध्येही विभाजीत केले जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना एक सुव्यवस्थित प्रश्नपत्रिका मिळणार आहे. त्यात सर्व प्रश्न विविध उपविभागात विभागलेले असतील. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न एकाच विभागात असतील. त्यानंतर अधिक गुण असलेले प्रश्न असतील. पेपर फुटीला आळा घालण्यासाठी सीबीएसईने यावेळी काही कठोर पावले उचलली आहेत. परीक्षा केंद्रांवर ज्या परीक्षा नियंत्रकांना गोपनीय दस्तऐवज सांभाळायचे आहेत. अशा अधिकाऱ्यांचे रिअल टाइम ट्रँकिंग केले जाणार आहे. गतवर्षी दहावीचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्र विभागाचा पेपर फुटला होता.

Exit mobile version