Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माणुसकीचं काम करणारे सच्चे कोरोना योद्धे दुर्लक्षितच (व्हिडिओ)

खामगाव, अमोल सराफ । आपल्या प्रिय लोकांना निरोप देण्यासाठी हजारो लोकांचा सहभाग असलेल्या अंत्ययात्रा अनेकांनी पाहिल्या आहेत. मात्र, कोरोनामुळे परिस्थिती बदलली, जीवाच्या आकांताने रस्ता पार करणारी अॅम्बुलन्स स्मशानभूमीच्या दारावर शांत होऊन जात आहे. खामगावामध्ये असंच काही चित्र आहे. पीपीई कीट घातलेले दोन कर्मचारी मृतदेह घेऊन अॅम्बुलन्समधून उतरतात. अंतिम संस्कारासाठी सोपवून निघून जातात. जिथे आप्तेष्ठही मृतदेहाला स्पर्श करायला तयार नसताना ‘ते’ युवक मात्र कोणतीही भीती न बाळगता त्या मृतदेहाला पंचतत्वात विलीन करण्याची काळजी घेतात. असे हे खरे कोरोना योद्धा आज दुर्लक्षित आहे. पाहूया आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांचा स्पेशल रिपोर्ट…..

कोरोनामुळे झालेला मृतकाचा अंतिम संस्कार हा संवेदनांना गोठवून टाकणारा क्षण. परिस्थितीच अशी आहे की, आपले सुध्दा मृतदेहाला हात लावू शकत नाहीत. अशा परिस्थितीत परिवार, कुटूंब, धर्म, समाज बाजूला ठेवून अत्यल्प मेहनतान्यावर अंतिम संस्कारासाठी जीवाची बाजी लावणारे अत्यंत दुर्लक्षित कोरोना योद्धे म्हणजेच हे स्मशान भूमीतील कर्मचारी आहेत. कोरोनापासून बचावाच्या विविध गाईडलाईन शासनाने जरी केलेल्या आहेत. यामध्ये कोरोनाबाधित व्यक्तीचे अंतिमसंस्कार कश्या पद्धतीने करण्यात यावे यासाठीही काही प्रोटोकॉल निर्धारित असतांना सुविधां अभावी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील हिंदू स्मशान भूमीत आप्तस्वकीयांना चेहराही पाहता येणे शक्य नसताना ‘ते’ अंत्यसंस्कार करतात हे काम पार पाडीत असतांना नगर पालिका प्रशासन, राजकारणी आणि स्थानिक लोकप्रतिधींनाही त्यांचा विसर पडला आहे.

या कारोनाने आयुष्यात कधीही पाहिल्या नाहीत अशा सर्व गोष्टी दाखवून दिल्याचे अनेकजण अगदी सहज बोलून दाखवतात. सध्या असलेली भीषण परिस्थिती पाहता ही बाब खरी असल्याचे अनेकांनी अनुभवले आहे.एखाद्या बेवारस व्यक्तीच्या मृतदेहावर संस्कार व्हावे तसे कुणीही आप्तस्वकीय हजर नसताना कोरोना बाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होतात. मात्र असे असतानाही कोरोनाचा संसर्गाचा धोका असूनही स्मशानामध्ये अशा शेकडो कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर धर्मातील चालीरितींप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचे काम पार पाडीत आहे. अश्या या माणुसकीचं काम करणार्या सच्च्या कोरोना योद्धांना लाईव्ह ट्रेंडस न्यूजचा सलाम….

 

 

 

Exit mobile version