खडसे एके खडसे !

जळगाव (प्रतिनिधी)  भाजपचे वर्चस्व असलेला रावेर लोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये तत्कालीन खासदार हरिभाऊ जावळे यांना डावलून एकनाथ खडसे यांनी आपली स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यास भाग पाडले होते. त्या निवडणुकीत स्वत: नाथाभाऊंनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आणि रक्षाताईंना ऐतिहासिक मताधिक्याने निवडून आणले होत. परंतु भाजपातील एक गट यावेळी रक्षाताईचे तिकीट कापले जाईल आणि हरिभाऊ जावळे यांना मिळेल अशा आवया उठवीत आहे. खरं म्हणजे हा मतदार संघ भाजप ऐवजी खडसे यांचा बालेकिल्ला म्हटला तरी चुकणार नाही. याला कारणही तसचं आहे. या मतदार संघात येणाऱ्या जामनेर वगळून प्रत्येक विधानसभा मतदार संघावर खडसेंची जबरदस्त पकड आहे. अगदी नगरध्यक्ष,नगरसेवक तसेच जिल्हा परिषद,पंचायत समितीमधील निवडून आलेले खडसे समर्थ सदस्यांच्या भल्या मोठ्या संख्येवरून लक्षात येते. एवढेच काय ज्या हरिभाऊंचे नाव पुढे केले जातेय अगदी ते देखील खडसेंच्या मदतीशिवाय आपण लोकसभाच काय तर विधानसभा देखील जिंकू शकत नाही, हे जाहीररित्या मान्य करतात. रावेर मतदार संघ लेवा बहुल मतदारसंघ मानला जातो आणि लेवा समाजाचे प्रमुख तथा भोरगाव लेवा पंचायतचे कुटुंब नायक रमेश पाटील यांनी तर काही महिन्यांपूर्वीच खडसेंच्या विषयावरून भाजप सरकारला इशारा दिला होता. एकंदरीत खडसेंना वगळून या ठिकाणी भाजपला विजयाचं गणित सोडवणं शक्य नाहीय. मुळात हा मतदार संघ हा अनेक पंचवार्षिक पासून एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. अगदी आ.खडसे यांनी पक्षांतर केले तरी त्यांचा उमेदवारच याठिकाणी विजयाचा सर्वात मोठा दावेदार असेल, ही वस्तुस्थिती कुणीही नाकारू शकत नाही. एकंदरीत या मतदार संघाची भाजपच्या दृष्टीने व्याख्या करायची म्हटली तर खडसे एक खडसे ! अशीच करता येईल.

 

एकनाथराव खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बहुजन नेत्याचा बळी गेला अशी चर्चा राजकारणाच्या सारीपाटावर रंगली होती. त्यामुळेच भाजपमध्ये बहुजनांवर कायम अन्याय होतो, या आरोपाला अधिक बळ मिळाले. कारण त्यानंतर महाराष्ट्रासह केंद्रात देखील अनेक मंत्र्यांवर आरोप झालेत. परंतु खडसें प्रमाणे कुणालाही राजीनामा द्यावा लागला नाही. जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील पकड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे खडसेंचे वर्चस्वाला जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सुरंग लावलाय. परंतु रावेर लोकसभा मतदार संघात खडसेंना बाजूला सारणे ही, भाजपसाठी मोठी आत्मघाती खेळी ठरण्याची शक्यता आहे. रावेर मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहता शहरी व ग्रामीण भागात देखील भाजपचीच पर्यायी आ.खडसे यांनीच पकड आहे. अगदी भाजपचा पक्षांतर्गत विषय केला तरी महाजन यांच्या तुलनेत रावेर लोकसभा मतदार संघात खडसे समर्थकांची संख्या जास्तच आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस,मंत्री गिरीष महाजन आणि आपले सासरे एकनाथराव खडसे यांच्यातील वादापासून खासदार रक्षाताई यांनी नेहमीचं स्वतःला वेगळ ठेवलंय.एवढेच नव्हे तर,दोन्ही गटात समन्वयही ठेवण्याचा रक्षाताईंनी चांगला प्रयत्न केलाय. त्यामुळे भविष्यात सगळं आलबेल झाले किंवा नाही,तरी रक्षाताई यांना व्ययक्तिक पातळीवर अडचण येणार नाही.

 

मतदार संघातील सर्वाधिक आमदार सोबत

 

रावेर लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या सहापैकी तब्बल पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत.त्यात मुक्ताईनगर-बोदवडमधून स्वत: एकनाथराव खडसे, मलकापूर- नांदुरा येथून चैनसुख संचेती,रावेर-यावमधून हरिभाऊ जावळे तर भुसावळमधून माजी पालकमंत्री संजय सावकारे यांचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून ना.महाजन यांचे मित्र अनिल चौधरी यांनी रावेर-यावल विधानसभा मतदार संघात वाढवलेला जनसंपर्क बघता आजच्या घडीला अगदी जावळे देखील खडसे यांच्याचं गटात समाविष्ट दिसताय. तर दुसरीकडे जामनेरमधून जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे विधानसभा सदस्य असून शिवसेनेचे चोपडा येथील आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचे देखील ना.महाजन यांच्या तुलनेत खडसे यांच्यासोबत जास्तीचे घनिष्ट संबंध आहेत. विशेष म्हणजे युती तुटल्यानंतर खडसे आणि शिवसेनेचे संबंध ताणले गेले होते. खडसेंवर अनेक शिवसेना नेत्यांनी टीका केली होती. परंतु आ.सोनवणे यांनी कधीही याबाबत प्रतिक्रिया नोंदवली नव्हती.

 

जामनेर,शेंदुर्णी,वगळता सर्व पालिकांत खडसे समर्थक

 

रावेर लोकसभा मतदारसंघात ९ नगरपालिका तर ४ नगरपंचायती आहेत. त्यातील भुसावळ,जामनेर,सावदा फैजपूर या चार पालिका भाजपकडे तर शिवसेनेच्या ताब्यात यावल ही अवघी एक पालिका आहे. तर मुक्ताईनगर,वरणगाव,शेंदुर्णी आणि बोदवड नगरपंचायती देखील भापाच्या ताब्यात आहेत. यातील जामनेर,वरणगाव,शेंदुर्णी आणि रावेर,यावल वगळता सर्व पालिकांवर खडसे यांची एकहाती पकड आहे. आजच्या घडीला त्यांचे समर्थकच याठिकाणी सत्तेत आहेत. तर वरणगावात देखील पालिकेतील एक गट खडसेंच्या बाजू आहे. तर रावेर व यावलमध्ये भाजप सत्तेत नसली तरी त्याठिकाणी निवडून आलेले भाजपचे सर्व नगरसेवक हे खडसेंच्या गटात मोडले जातात. दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील समाविष्ट मलकापूर विधानसभा मतदार संघातील मलकापूर पालिकेत कॉंग्रेसचे नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष असले तरी, याठिकाणी देखील निवडून आलेले नगरसेवक हे खडसे समर्थक आमदार संचेती यांचे निष्ठावान आहेत. तर नांदुरा पालिकेत स्थानिक आघाडीचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष आहे. परंतु काही दिवसांपूर्वी येथील नगराध्यक्षांनी भाजपात प्रवेश केला असल्यामुळे ते तूर्त भाजपचेच मानले जात आहे. या नगरध्यक्षांना भाजपात आणायचे श्रेय हे आ.संचेती यांनाच जाते.

 

एकंदरीत भाजपकडे पालिका आणि नगर पंचायत मिळून आठ लोकनियुक्त नगराध्यक्ष तर सात उपनगराध्यक्ष आहेत. चोपडा,रावेर या ठिकाणी स्थानिक आघाडींचे नगराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष आहेत. तर फैजपूर पालिकेत कॉंग्रेसचा उपनगराध्यक्ष आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण २९४ नगरसेवक असून त्यातील भाजपकडे ११२,राष्ट्रवादीकडे २३,शिवसेनेकडे १९ तर कॉंग्रेसकडे ३२ नगरसेवक आहेत. यावल पालिकेत शिवसेनेच्या नगराध्यक्ष असल्या तरी त्याठिकाणी ११ अपक्ष नगरसेवक निवडून आले असून त्यातील अनेक जण खडसे यांचे समर्थक आहे. एकंदरीत भाजपकडे असलेल्या ११२ नगरसेवकांपैकी किमान ९० नगरसेवक तरी खडसे यांचे कट्टर समर्थक आहेत. दुसरीकडे जामनेर,शेंदुर्णी या दोन ठिकाणी ना. गिरीष महाजन वर्चस्व राखून आहेत. तर वरणगावात दोन गट आहेत.

 

पंचायत समितींवर खडसेंचीच पकड

रावेर लोकसभा मतदारसंघात नऊ पंचायत समित्या असून, त्यातील रावेर,यावल,भुसावळ,जामनेर,मुक्ताईनगर,बोदवड,चोपडा व मलकापूर या एकूण आठ पंचायत समितींवर भाजपचा झेंडा आहे. याठिकाणी भाजपचे सभापती विराजमान असून यातील जामनेर वगळता सर्व पंचायत समिती सभापती हे खडसे गटाचे मानले जातात. दुसरीकडे नांदुरा पंचायत समितीतील भाजपचे उपसभापती हे खडसे समर्थक आमदार संचेती यांच्या गटातील आहेत. रावेर मतदारसंघात एकूण ८० पंचायत समितीच्या गणांमध्ये भाजपकडे सर्वाधिक ४७ जागा आहेत. तर राष्ट्रवादीकडे १४,कॉंग्रेसकडे ९,शिवसेनेकडे ८ जागा तर २ जागा अपक्षांकडे आहेत. यातील जामनेरमधील १० पंचायत समिती सदस्य वगळता ३० पंचायत समिती सदस्य हे खडसे यांच्या गोटातील मानले जातात.

 

जिल्हा परिषदेतही सर्वाधिक सदस्य खडसे गटाचे

रावेर लोकसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे ४० गट आहेत. त्यापैकी सर्वाधिक २५ जिल्हा परिषद सदस्य भाजपकडे आहेत. जळगाव जिल्हापरिषदच्या एकूण ६७ सदस्यांपैकी तब्बल २२ जिल्हा परिषद सदस्य रावेर लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीकडे ६,कॉंग्रेसकडे ६ तर शिवसेनेकडे ३ सदस्य आहेत. विशेष म्हणजे या मतदार संघात देखील जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपकडे आहे. बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मलकापूर तालुक्याकडे आहे. याचाच अर्थ जळगाव आणि बुलढाणा या दोन्ही ठिकाणी खडसे समर्थक जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत. या लोकसभा मतदार संघातील जामनेर मधील ५ जि.प.सदस्य वगळता, इतर खडसे यांचेच निकटवर्तीय आहेत.

लोकसभेसाठी रक्षाताईंशिवाय पर्याय नाही

आ. खडसे यांचे भाजपातील वर्चस्व कमी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या स्नुषा रक्षाताई खडसे यांचे तिकीट कापण्यासाठी भाजपातीलच एक गट खूप उत्सुक आहे. परंतु खडसे यांचा पाठींबा असल्याशिवाय या मतदार संघात कोणत्याही उमेदवाराला विजय मिळविणे पाहिजे तेवढे सोपे नाही,हे देखील तेवढेच खरे आहे. जळगाव जिल्हा भाजप सध्या एकनाथराव खडसे आणि गिरीष महाजन यांच्यात अनेक दिवसापासून शीतयुद्ध सुरु आहे. विशेष म्हणजे या दोघं नेत्यांचे विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदार संघातच येतात. परंतु जामनेर वगळता ना.महाजन यांना अजूनही इतर मतदार संघात खडसे यांच्या प्रमाणे पकड बनविता आलेली नाहीय. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघ हा अद्यापही खडसे यांचा बालेकिल्लाच मानला जातो. मागील निवडणुकीत ऐनवेळी हरिभाऊ जावळे यांचे तिकीट कापले गेल्यामुळे त्यांची नाराजी स्वाभाविक होती. परंतु हरिभाऊंच्या रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात ना.महाजन यांचे कट्टरसमर्थक अनिल चौधरी हे तयारी करताय. त्यामुळे हरिभाऊ अस्वस्थ झाले होते. परंतु अनेपक्षितरित्या खडसे हे हरिभाऊंच्या मदतीला धावून आले. त्यामुळे हरिभाऊंना सध्या तरी फक्त खडसे यांचाच आधार आहे.

 

या मतदार संघात लेवा समाज बहुसंख्य असल्यामुळे या मतदार संघात कायमच लेवा उमेदवार विजय मिळवीत आलेला आहे. विद्यमान खासदा रक्षाताई खडसे यांचा जनसंपर्क प्रचंड मोठा आहे.अगदी या मतदार संघातील प्रत्येक आदिवासी पाड्यावर त्यांनी भेट दिली आहे. सोशल मिडीयावर त्यांच्या समर्थकांची संख्या लाखोच्या घरात आहे. रक्षाताई या मतदार संघातील प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून भेट देतात. त्यामुळे त्यांच्या जनसंपर्क दांडगा आहे. विकास कामांमुळे देखील त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा आहे. जिल्ह्यात सलग काही वर्षापासून सैन्यभरती आणण्यासाठी रक्षाताई यांचे विशेष प्रयत्न असल्यामुळे खासकरून त्या तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. विविध प्रवाशी रेल्वे गाड्याना थांबा मिळवून दिल्यामुळे देखील सर्वसामान्य नागरिकांमध्येही त्या लोकप्रिय आहेत. एकंदरीत फक्त खडसे द्वेषातून आणि सत्तेच्या अविर्भावात भाजपने काही निर्णय घेतल्यास त्यांना रावेर लोकसभा मतदार संघात पटकी खाण्याचा धोकाच अधिक आहे.

One Response

  1. Dattu Bhole

Add Comment

Protected Content