Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कपिल सिब्बल यांचा कॉंग्रेसला रामराम : सपाच्या पाठींब्यावर उमेदवारी !

लखनऊ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज, वृत्तसंस्था | कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

कॉंग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते कॉंग्रेला सोडून जात आहेत. आधी ज्योतिरादित्य सिंधीया यांनी पक्ष सोडला त्यानंतर हार्दिक पटेल यांनी झटका दिला होता. तर त्यांचा पाठोपाठ पंजाबमधून कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी समाजवादी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सिब्बल यांनी सपाच्या तिकिटावर राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. सिब्बल यांनी बुधवारी लखनऊमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी १६ मे रोजीच कॉंग्रेसचा राजीनामा दिल्याचे सांगितले. सिब्बल यांच्या नामांकनावेळी सपा प्रमुख अखिलेश यादव आणि राम गोपाल यादवही उपस्थित होते.
दरम्यान, कपिल सिब्बल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अखिलेश यादव म्हणाले की, सपाच्या पाठिंब्याने सिब्बल राज्यसभेवर जाणार आहेत. याशिवाय आणखी दोन लोक सभागृहात जाऊ शकतात असे यादव म्हणाले. सिब्बल हे ज्येष्ठ वकील असून, यापूर्वीच्या काळात त्यांनी संसदेत अनेकदा चांगली मते मांडली आहेत. त्यामुळे आम्हाला आशा आहे की, आगामी काळात ते समाजवादी पक्षाची आणि स्वत:ची मते सभागृहात मांडतील.

Exit mobile version