Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कांताई नेत्रालयाचा 10 हजाराच्यावर शस्त्रक्रियेचा टप्पा पार

जळगाव (प्रतिनिधी) पीबीएमएएस व भवरलाल एण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलित कांताई नेत्रालयाने अवघ्या तीन वर्षांमध्ये दहा हजार नेत्रशस्त्रक्रियांचा महत्त्वपूर्ण टप्पा आज पार केला. या यापार्श्वभुमीवर आयोजित कार्यक्रमात रूग्णांना चष्मा वाटप करण्यात आले. याप्रसंगी जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य दलिचंद जैन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, गिरीधारीलाल ओसवाल, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन, कांताई नेत्रालयाच्या डॉ. भावना जैन, डॉ. अंशू ओसवाल यांच्यासह जैन परिवारातील सदस्य उपस्थित होते.

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी सामाजिक कार्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. गरजू रूग्णांना अल्पदरात उच्च दर्जाची नेत्रसेवा मिळावी यासाठी तीन वर्षापूर्वी कांताई नेत्रालयाची उभारणी करण्यात आली. कांताई नेत्रालयाने आधुनिक उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमांतून तीन वर्षात दहा हजारावर नेत्रशस्त्रक्रिया पार पाडल्यात. यामध्ये सहा हजाराच्या वर मोफत शस्त्रक्रिया होत्या. तीन वर्षांमध्ये विविध नेत्र शिबीर व प्रत्यक्ष बाह्य तपासणी कक्षाच्या माध्यमातून 1 लाख 17 हजार 172 रूग्णांची तपासणी करण्यात आली.

आज कांताई नेत्रालयात झालेल्या कार्यक्रमात नेत्ररूग्णांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी संवाद साधताना संघपती दलिचंद जैन म्हणाले की, जगात जे करायचेय ते अद्वतीय. अशी शिकवण भवरलालजी जैन यांनी दिली होती. त्याच शिकवणीच्या आधारावर कांताई नेत्रालयाची वाटचाल सुरू आहे. या रूग्णालयामध्ये गोर गरिब रूग्णांवर अल्पदरात उच्च दर्जाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात ही एकप्रकारे समाजसेवाच आहे. भवरलाल जैनांनी दिलेला समाजसेवेचा वारसा त्यांच्या परिवारातील सदस्य पुढे चालवत असल्याचा आनंद आहे.

माजी मंत्री सुरेशदादा जैन यावेळी बोलताना म्हणाले की, कांताई नेत्रालयातील अत्याधुनिक यंत्रणा, प्रसन्न वातावरण, तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रूग्णांची सेवा ही एक प्रकारे माणूसकीची सेवा करण्याचाच भाग आहे. भवरलालजी जैन यांच्याकडून मिळालेला सामाजिक वारसा जैन परिवार जपत आहे. सार्थक करूया जन्माचे रूप पालटू वसुंधरेचे हे भाऊंचे ब्रिद घेवून कुटुंब वाटचाल करीत असल्याचा आनंद आहे.

जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य गिरधर ओसवाल, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी आणि वैष्णवी जैनचे पालक गणेश जैन यांनी मिळालेल्या उपचाराबाबत मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. अंशू ओसवाल यांनी प्रास्ताविक केले. अमर चौधरी यांनी कांताई नेत्रालयाच्या तीन वर्षाच्या कार्यकाळाचे सादरीकरण केले. डॉ.भावना जैन यांनी आभार मानले. किशोर कुळकर्णी यांनी सुत्रसंचालन केले.

Exit mobile version