Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कन्हैया कुमारला बेगुसरायमधून सी.पी.आय.ची उमेदवारी

 

 

 

 

 

पाटणा (वृत्तसंस्था) वादग्रस्त विद्यार्थी नेता म्हणून प्रकाशात आलेला कन्हैया कुमार बिहारच्या बेगुसरायमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये महाआघाडी करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. मात्र महाआघाडीनं तिकीट न दिल्यानं कन्हैया कुमार बेगुसराय मतदार संघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे. पक्षाचे बिहार राज्याचे सचिव सत्यनारायण सिंह यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

कन्हैया कुमार बेगुसरायमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्यानं या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणारे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, मोदी लाटेतही स्वत:चा ठसा उमटवणारे राष्ट्रीय जनता दलाचे तन्वीर हसन यांच्याशी कन्हैया कुमार याला दोन हात करावे लागणार आहेत. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील निवडणुकांमध्ये यशस्वी राजकारण करत तरुणांमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या कन्हैया कुमारला इतर डाव्या पक्षांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
कन्हैया कुमारला राष्ट्रीय जनता दलाकडून तिकीट मिळेल, अशी अपेक्षा सीपीआयला होती. मात्र राजदने त्याला उमेदवारी न दिल्यानं सीपीआयनं त्यांना आपल्या तिकीटावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी बेगुसराय मतदारसंघ सीपीआयचा बालेकिल्ला मानला जायचा. अनेक निवडणुकांमध्ये सीपीआच्या उमेदवारानं बेगुसरायमधून यश संपादन केलं आहे. मात्र ९० च्या दशकानंतर डाव्यांचा हा बालेकिल्ला ढासळला. हा मतदारसंघ राखण्यासाठी डाव्यांना राजदची गरज भासू लागली. त्यामुळे राजदचा समावेश असलेल्या महाआघाडीकडून कन्हैया कुमारला उमेदवारी मिळेल, अशी आशा सीपीआयला होती. मात्र राजदनं त्याला तिकीट नाकारून डाव्यांपासून हाताच्या अंतरावर राहणेच पसंत केले आहे.

Exit mobile version