Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कंगनाने आता महात्मा गांधींवर साधला निशाणा

मुंबई प्रतिनिधी | स्वातंत्र्यावरून वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून देणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने आता थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर निशाणा साधून त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.

कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. गांधी आणि इतर नेताजींना सोपवण्यास तयार झाले होते अशी या बातमीची हेडलाइन आहे. या रिपोर्टमध्ये महात्मा गांधींसोबत जवाहरलाल नेहरु तसंच मोहम्मद अली जिन्ना यांनी एका ब्रिटीश न्यायाधीशांसोबत सुभाषचंद्र बोस देशात आल्यानंतर त्यांना सोपवण्यात येईल असा करार केल्याचा दावा आहे. यावरून तिने इन्स्टाग्रामवर भाष्य केले आहे.

यात कंगनाने म्हटले आहे की, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना सत्तेच्या भुकेल्या आणि धूर्त लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले होते. हे तेच लोक होते ज्यांनी त्यांचे शोषण केले. यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती किंवा त्यांचे रक्तही उसळले नाही. हेच लोक आम्हाला शिकवतात, जर तुम्हाला कोणी थप्पड मारली तर दुसर्या गालावर दुसरी थप्पड खा आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. पण कोणालाही असे स्वातंत्र्य मिळत नाही. अशा प्रकारे फक्त भीक मिळते. म्हणून आपले आदर्श हुशारीने निवडा, असे कंगनाने म्हटले आहे.

यासोबत दुसर्‍या मेसेजमध्ये कंगना म्हणते की, गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना समर्थन दिले नाही. भगतसिंगच्या फाशीला गांधींचा पाठिंबा होता, असे बरेच पुरावे आहेत. यामुळे कोणाचे समर्थन करावे हे तुम्ही ठरवले पाहिजे. कारण या सर्व गोष्टी मनात ठेवून त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणे पुरेसे नाही. खरे तर हे मौन अतिशय बेजबाबदार आणि वरवरचे आहे. प्रत्येकाला त्यांचा इतिहास आणि आदर्शाबद्दल माहिती असणं आवश्यक आहे, असे कंगनाने म्हटले आहे.

कंगनाच्या आधीच्या वक्तव्यांवरून उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आता तिने नव्याने मुक्ताफळे उधळल्याने यावरून पुन्हा वाद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version