Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कालीचरण महाराजांची महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह टिपण्णी : कारवाईची मागणी

मुंबई प्रतिनिधी | शिवतांडव स्तोत्राच्या व्हिडीओमुळे जगप्रसिध्द झालेले अकोला येथील कालीचरण महाराज यांनी धर्मसंसदेत बोलतांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत अतिशय खालच्या स्तरावरून आक्षेपार्ह टिपण्णी केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आता त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. रायपूरमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या धर्मसंसदेत बोलतांना त्यांनी पातळी सोडून केलेली टिपण्णी ही टिकेचे लक्ष्य बनली आहे. या व्हिडीओत कालीचरण महाराजानं गांधीजींना अपशब्द म्हटल्यानंतर नथूराम गोडसेचे आभार मानलेत. त्याच्या कृतीचं अभिनंदन केलंय. कॉंग्रेसच नाही तर अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींनी कालीचरण महाराजाविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली आहे.

कालीचरण महाराज हे अकोला येथील रहिवासी असून त्यांचे मूळ नाव अभिजित धनंजय सराग होय. तारूण्यातच तो कालीचरण महाराज झाला. तोही आपण कालीमातेला आई तर अगस्ती ऋषींना गुरु मानत असल्याचं म्हणायला लागला. एकेदिवशी अकोल्यातल्या पुरातन शिवमंदीरात ह्याच कालीचरण महाराजानं शिवतांडव स्तोत्र म्हटलं आणि तो जगप्रसिद्ध झाला. मात्र यानंतर आक्षेपार्ह वक्तव्यांनी तो वादात सापडला आहे.

डिसेंबरच्या प्रारंभी याच कालीचरण महाराजने सांगली येथे कोरोनाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ते म्हणाले कोरोना हा मोठा फर्जीवाडा असून सध्या काही जण लोकांना मारुन फेकत आहेत, ह्यांना डॉक्टरच मारतायत आणि त्यांच्या किडनी, मानवी अवयवांची तस्करी केली जातेय. यानंतर आता थेट राष्ट्रपित्यावर टीका केल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.

Exit mobile version