Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कळमसरे ते शहापूर रस्त्याची दयनीय अवस्था

shahapur road

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे ते शहापूर या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था बनली असून याला त्वरीत नव्याने तयार करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

याबाबत वृत्त असे की, धुळे, शिरपूर, दोंडाईचा, नंदुरबार आदी शहरांमध्ये जाण्यासाठी तालुक्यातील बहुतांश वाहतूक शहापूर रस्त्यावरून होत असते. मात्र हा रस्ता खड्डमय झालेला असून वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाने कानाडोळा केल्याने मागील तीन ते चार वर्षापासून नेहमीच दुर्लक्षित असलेला शहापुर रस्ता हा पूर्णत: खड्डेमय झाला असून निवडणूक आली की नागरिकाना फक्त आश्‍वासन दिले जाते मात्र नंतर याकडे दुर्लक्ष केले जाते. या रस्त्यावर कधी काळी डांबरीकरण झाले होते की नाही? हेच वाहन चालकांना कळत नाही. अशाच परिस्थितीत पुन्हा या रस्त्यावर काटेरी झुडुपांनी अतिक्रमण केल्याने समोरून येणारे वाहन ही पूर्णता दिसत नसल्याने कुठल्याही क्षणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे परिसरातील वाहन धारकांना अधिक प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागते.

कळमसरे ते शहापुर या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर एकाच टप्यात डांबरीकरण न केल्याने याची दुर्दशा झाली आहे. यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांनी रस्ता बदलवित दुसर्‍या मार्गाने जाणे पसंत केल्याचे दिसून येत आहे. याची दुरुस्ती न केल्यास आगामी निवडणूकित त्यांचे परिणाम भोगावे लागतील.

दरम्यान, मागील दोन महिन्यापासुन ठीक ठिकाणी खड्डे बुजन्यासाठी खडी टाकली आहे.मात्र पावसाला जवळ आल्यानंतर ही खडी पडून असल्यामुळे वाहनधारकांच्या समस्येत अजून भर पडली आहे. यामुळे हा रस्ता त्वरीत दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.

Exit mobile version