Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनामुळे यंदा काकणबर्डी यात्रा रद्द

पाचोरा प्रतिनिधी । काकनबर्डी येथील यात्रोत्सव यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला असुन याबाबतचे लेखी आदेश काढण्यात आले आहे.

ओझर ता. पाचोरा येथुन जवळच असलेल्या काकनबर्डीच्या टेकडीवर खंडेराव महाराजांचे प्रसिद्ध मंदिर आहे. या ठिकाणी अनेक वर्षांपासून यात्रोत्सव होत असतो. यावर्षी दि. २० डिसेंबर २०२० रोजी ही यात्रा भरणार होती. मात्र कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने दक्षता म्हणुन सदरची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला असुन पाचोरा पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आदेश दिले आहेत. तरी भाविक भक्तांनी काकनबर्डी येथे यात्रोत्सवासाठी व व्यावसायिक बांधवांनी कोणतेही दुकाने, मनोरंजनात्मक पाळणे आदी न लावण्याचेही आवाहन केले आहे. सदरहु आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले काकनबर्डी हे खंडेरायांचे प्रसिद्ध देवस्थान आहे. नवसाला पावणारा खंडेराया अशी आख्यायिका आहे. याठिकाणी जिल्ह्यासह परराज्यातील भाविक भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवस बोलतात. मनोकामना पूर्ण झाल्यावर याठिकाणी येवुन बोललेला नवस फेडतात. वर्षानुवर्षे चालत असलेली ही परंपरा यार्षी कोरोना संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावामुळे खंडीत झाली आहे.

व्यावसायिकांचा कल हा ग्रामिण भागातील परंपरागत चालत असलेल्या यात्रौत्सवांकडे असतो. तसाच याठिकाणी प्रत्येक व्यावसायिक आप-आपला व्यवसाय हा वर्षभर वाट बघुन आपल्या व्यवसायाचे नियोजन करुन आर्थिक गणिते जुळवत असतात. परंतु कोरोनाच्या साथीमुळे सदरचे यात्रोत्सव रद्द झाल्याने व्यावसायिकांचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल होणारे यात्रोत्सव बंद झाल्याने आर्थिक  उलाढाल ठप्प होणार आहे. यामुळे अनेक व्यावसायिकांना आता पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.

 

 

Exit mobile version