Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘मराठा’ म्हणून एकनाथ शिंदे यांचा योग्य निर्णय ! : ज्योतिरादित्य

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत मोठे चर्वण सुरू असतांना केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या निर्णयाचे जोरदार समर्थन करत ‘मराठा’ म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगितले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे राजकारण ढवळून निघाले. शिवसेनेसारख्या पक्षात अशा स्वरूपाचे बंड कसे होऊ शकते ? असा सवाल उपस्थित करत सर्वांनाच या प्रकाराचे गुढ वाटत आहे. या पार्श्‍वभूमिवर, एकनाथ शिंदे यांना अकस्मात मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर तर अजूनच याबाबत चर्चेला उधाण आले आहे. हे सर्व सुरू असतांना केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेले एक वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे.

ज्योतिरादित्य यांनी एनएनआय या वृत्तसंस्थेशी बोलतांना एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याने समर्थन केले आहे. एक मराठा म्हणून त्यांनी योग्य निर्णय घेतला असून यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण लागणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. फडणवीस यांच्या सोबतची त्यांची जोडी ही महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण असल्याने मुख्यमंत्रीपदापासून डावलण्यात आल्याचा अनेक संघटनांनी दावा करत भाजपच्या या निर्णयाचा विरोध सुरू केला आहे. तर मराठा असल्याचा एकनाथ शिंदे यांना लाभ मिळाल्याचेही मानले जात आहे. या पार्श्‍वभूमिवर, ज्योतीरादित्य शिंदे यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. विशेष बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच ज्योतिरादित्य यांनी देखील मध्यप्रदेशात सत्तांतर घडवून आणले होते.

Exit mobile version