Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुरांच्या गाडीचे फोटो काढल्यावरून पत्रकारांना मारहाण

सावदा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गुरांच्या गाडीचे छायाचित्रण केल्यामुळे त्याविषयी जाब विचारत पत्रकारांना मारहाण केल्याची घटना सावदा येथे घडली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी कि, ‘जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर रविवारी मोठ्या प्रमाणावर गुरे ढोरांचा बाजार भरत असतो. या निमित्ताने काही तस्कर सावदा येथील तरूणांना हाताशी धरून थेट परराज्यातून मोठ्या वाहानाद्वारे गुरे सावदा येथे आणले जातात. यानंतर त्यांना आपल्या स्वतःच्या गोडाऊनला उतरून या त्याची नियोजनबद्ध पद्धतीने तात्काळ लहान वाहनांच्या मदतीने विल्हेवाट लावली जाते.

या संदर्भात मिळालेल्या माहितीची खात्री करून सोमवार, दि.२८ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास वृत्त संकलनासाठी दैनिक मराठा दर्शनचे प्रतिनिधी फरीद शेख आणि नवभारत टाइम्सचे प्रतिनिधी युसूफ शाह यांनी गौसिया नगर येथे जाऊन गाडीमध्ये अंधारमय वातावरण निर्माण करून बॅटरीच्या साह्याने गोवंश भरत असल्याचे संशय आल्याने गुरांच्या गाडीचे छायाचित्रण केले आणि ते घरी परतले.

मंगळवार, दि.२९ मार्च रोजी दुपारी १ वा. नेहमीप्रमाणे दोघे प्रतिनिधी जमादारवाडा येथे वडाच्या झाडाखाली बसून चर्चा करीत असतांना मुजफ्फर राजा कुरेशी, शेख साहिल शेख जावेद कुरेशी, अर्शद उर्फ अज्जा इस्राईल कुरैशी व फय्याज शेख जग्गा यांनी, “तुम्ही रात्री आमच्या गुरांच्या गाडीचे फोटो का काढले ? असा जाब विचारत शिवीगाळ केली आणि पाईपच्या सहाय्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी युसूफ शाह व शेख रउफ शेख नजीर यांनी वेळप्रसंगी स्वतःचा बचाव केला.’

परिणामी शेख फरीद शेख नूरोद्दीन यांनी या घटनेची फिर्याद दिली. त्यानुसार हिंसक हल्ला करणाऱ्या चौघांविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. पुढील तपास एपीआय देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.रुस्तम तडवी हे करीत आहे.

Exit mobile version