Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : जितेंद्र आव्हाडांची आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा

ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरूध्द महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच त्यांनी आज पहाटेच आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केल्याने खळबळ उडाली आहे.

माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंग केल्या प्रकरणी मुंब्रा भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. काल कळवा आणि ठाणे शहराला जोडणार्‍या तिसर्‍या कळवा खाडी पुलाचे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पीडित महिलेसह अन्य नेते उपस्थित होते. संध्याकाळी नवीन उड्डाणपुलाच्या उद्घाटन समारंभात ही घटना घडल्याचा दावा एका ४० वर्षीय एका महिला सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. या महिलेचा दावा आहे की, आव्हाड यांनी महिलेला चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत तिला बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने तक्रार केल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, यानंतर आज सकाळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. आपल्यावर ७२ तासांमध्ये दुसरा खोटा गुन्हा दाखल केला असून पोलीस अत्याचाराच्या विरोधात आपण लढा देणार असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. या घोषणेमुळे खळबळ उडाली आहे.

Exit mobile version