Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओबीसींवरील वक्तव्यामुळे जितेंद्र आव्हाड गोत्यात

मुंबई प्रतिनिधी | ओबीसी समुदायावर आपला विश्‍वास नसल्याचे वक्तव्य केल्याने राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.

 

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पार्टीने केलीय. महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामधील आव्हाड यांच्या भाषणाचा ५१ सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

 

ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं, असं आव्हाड या व्हिडीओत म्हणता दिसत आहेत. यात ते पुढे म्हणतात की, ओबीसींवरती ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा बसलाय. आपण श्रेष्ठ आहोत. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाहीत. हे सगळे विसरलेत. आता आरक्षणाच्या निमित्ताने का असेना पुढे येतायत. पण नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही, रस्त्यावर यावं लागेल, असं आव्हाड म्हणाले आहेत.

 

दरम्यान यावरून वादंग निर्माण झाले आहे. ओबीसी समाजाचा अपमान करणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा राष्ट्रवादी कॉंग्रेस घेणार का?, असा प्रश्न भाजपाने उपस्थित केलाय. तसेच राष्ट्रवादीच्या मनात ओबीसी समाजाबद्दल एवढा राग का?, यासाठीच ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवंल का?, असा प्रश्नही भाजपाने विचारला आहे. तर ओबीसी समुदायातील नेते आणि सामाजिक कार्यर्त्यांनीही आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

Exit mobile version