Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जेसीएल : कोझी कॉटेज स्ट्रायकर्स व खान्देश ब्लास्टसमध्ये रंगणार फायनल

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे रतनलाल सी. बाफना यांच्या सहकार्याने आयपीएलच्या धर्तीवर आयोजित करण्यात आलेल्या जळगाव क्रिकेट लीग अर्थात जेसीएल टी२० स्पर्धेत कोझी कॉटेज स्ट्रायकर्स व खान्देश ब्लास्टर्स या संघामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे.

सेमी फायनलमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्सने रायसोनी अचिव्हर्सचा तर खान्देश ब्लास्टर्सने एम.के. वॉरियर्सचा पराभव करीत फायनलमध्ये प्रवेश केला. मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स तर्फे ९६ धावांची तडाखेबंद खेळी करुन विजयाचा शिल्पकार ठरलेला जितेंद्र नाईक तर खान्देश ब्लास्टर्स तर्फे ६५ धावांची खेळी करणारा मयुरेश चौधरी हे सामनावीर ठरले. जेसीएल टी२० ला बेन्झो केम, सातपुडा ऑटोमोबाईल, आय केअर ऑप्टिकल, कांताई नेत्रालय, दाल परिवार, पगारिया बजाज, मकरा एजन्सीज, कोठारी ग्रुप नमो आनंद, फ्रुटुगो, हिरा रोटो पॉलिमर्स, भंडारी कार्बोनिक यांचे सहकार्य लाभले आहे.

जेसीएलमध्ये चौथ्या दिवशी रात्री उशिरा संपलेल्या सामन्यामध्ये स्पेक्ट्रम चॅलेंजर्स संघाने सिल्वर ड्रॉप हेल्दी मास्टर्स संघाचा ४ गडी राखुन पराभव केला. सिल्वर ड्रॉप हेल्दी मास्टर्स संघाने प्रथम फलंदाजी करीत २० षटकात सर्व बाद १२१ धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळतांना स्पेक्ट्रम चॅलेंजर्स संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात १२४ धावा करुन विजय मिळवला. सिल्वर ड्रॉप हेल्दी मास्टर्स संघातर्फे रिषभ कारवा ४८ धावा (४ चौकार व ३ षटकार) व शिव पुरोहित याने ४० धावा (५ चौकार) केल्या. जगदिश झोपे व कल्पेश देसले ३ व मेहुल इंगळे याने २ गडी बाद केले. स्पेक्ट्रम चॅलेंजर्स संघातर्फे जगदिश झोपेने ३७ धावा (२ चौकार व ३ षटकार) व कल्पेश देसलेने २१ धावा (१ चौकार व १ षटकार) केल्या.अष्टपैलू कामगिरी करणारा जगदिश झोपे सामनावीराचा मानकरी ठरला.

पहिल्या सेमी फायनलच्या सामन्यामध्ये सामन्यामध्ये मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्सने रायसोनी अचिव्हर्सचा २० धावांनी पराभव करीत फायनलमध्ये प्रवेश केला. टॉस जिंकुन प्रथम फलंदाजी करतांना मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्सच्या संघाने ६ बाद १६१ धावा केल्या. त्यात जितेंद्र नाईकने एकाकी झुंझ देत ५५ चेंडूमध्ये ६ चौकार व ९ षटकारांच्या मदतीने तडाखेबंद ९६ धावा केल्या. ओम मुंडेने २४ धावांचे योगदान दिले. रायसोनी अचिव्हर्स तर्फे सचिन चौधरीने ४ षटकात २२ धावा देत ३ गडी बाद केले. चारुदत्त नन्नवरे, अशफाक शेख यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात खेळतांना रायसोनी अचिव्हर्सचा संघ निर्धारीत २० षटकात ९ बाद १४१ धावाच करु शकला. त्यात लतिकेश पाटील ४९ धावा (८ चौकार व १ षटकार) व चारुदत्त नन्नवरेने २३ धावांचे योगदान दिले. मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स तर्फे ओम मुंडे व संकते पांडेने प्रत्येकी ३ गडी बाद केले. तसेच शुभम पाटील, आमिर खान, पवन तायडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. ९६ धावांची तडाखेबंद खेळी करणार्‍या जितेंद्र नाईकचा महावीर क्लासेसचे नंदलाल गादीया यांच्या हस्ते सामनावीराचा सन्मान देण्यात आला.

दुसरा उपांत्य सामना सामना खान्देश ब्लास्टर्स व एम.के. वॉरियर्स यांच्यामध्ये रंगला. खान्देश ब्लास्टर्सने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मयुरेश चौधरीने ४५ चेंडूमध्ये ६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ६५ धावा केल्या. कुणाल फालकने २७ चेंडूंचा सामना करीत ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ताबडतोब ४७ धावा केल्या. खान्देश ब्लास्टर्सने २० षटकांमध्ये ९ बाद १६२ धावांचे आव्हान एम.के. वॉरियर्स समोर ठेवले होते. एम.के. वॉरियर्स तर्फे तनेश जैनने ४ षटकात २९ धावा देत ४ गडी बाद केले. शुभम नेवे व राहुल निंभोरे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात खेळतांना एम.के. वारियर्सचा संघ सर्वबाद १२४ धावाच करु शकला. सौरभ सिंगने सर्वाधिक २३ धावा (१ चौकार व २ षटकार) केल्या. खान्देश ब्लास्टर्स तर्फे धवल हेमनानीने ४ षटकात २७ धावा देत ३ गडी बाद केले. वकार शेख व कुणाल फालक यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. ६५ धावांची खेळी करणार्‍या मयुरेश चौधरीला जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास सोनवणे व देशदूतचे संपादक हेमंत अलोने यांच्या हस्ते सामनावीराचा सन्मान देण्यात आला.

स्पॉट दि एरर फाइंड अल्फा बेट्स स्पर्धा
जेसीएल टी २० मध्ये दि. १२ तारखेपासून तर आजपर्यंत स्पॉट दि एरर फाईंड अल्फा बेट्स ही ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा शहरातील कांताई नेत्रालय व आय केअर ऑप्टिकल्सने पुरस्कृत केली होती. या स्पर्धेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. त्यामधील भावेश पाटील, इरफान पठाण, स्वरुप महाजन, जयेश कुळकर्णी या चार विजेत्यांना कांताई नेत्रालयाचे अमर चौधरी यांच्या हस्ते कुपन स्वरुपातील पारितोषीके देण्यात आली.

रविवार, दि. १७ मार्च रोजी फायनल असल्याने जेसीएलचा पहिला विजेता आज ठरणार आहे. तो कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरीकांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जेसीएलची फायनल बघायला मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version