Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जेसीआय डायमंड सिटीतर्फे बिझनेस वीकच्या अंतर्गत कार्यक्रम

जळगाव प्रतिनिधी । जेसीआय डायमंड सिटीतर्फे बिझनेस वीकच्या अंतर्गत अध्यापिक महाविद्यालयात व्यक्तीमत्व विकासावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जेसीआय डायमंड सिटी शाखेतर्फे सातत्याने नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने संस्थेतर्फे नुकत्याच राबविण्यात आलेल्या बिझनेस वीकच्या अंतर्गत शहरातील अध्यापिक महाविद्यालयात व्यक्तीमत्व विकासावर कार्यक्रम घेण्यात आला. यात ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील आणि विख्यात कवयत्री डॉ. प्रियंका सोनी यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष जीनल जैन यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी जेसीआय डायमंड सिटीतर्फे वेळोवेळी राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमांबाबत माहिती दिली. शेखर पाटील म्हणाले की, सध्या सोशल मीडिया विपुल प्रमाणात वापरला जात असून यामध्ये काहीही गैर नाही. तथापि, याचा वापर हा विधायक कामांसाठी व्हावा. सर्वात महत्वाची बाब म्हणजे अनेक शैक्षणिक अ‍ॅप्स हे विद्यार्थ्यांसाठी उपकारक असून याचा चांगल्या कामांसाठी वापर करण्याची आवश्यकता आहे. सोशल मीडियात आपण सहजपणे अभिव्यक्ती करू शकतो. याच प्रमाणे प्रत्यक्ष जीवनातही आपण संवाद कौशल्य संपादन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

डॉ. प्रियंका सोनी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थीनींना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी देहबोलीसह विविध आयामांना अगदी सहजसोप्या शब्दांमध्ये उलगडून सांगितले. आपण अतिशय आत्मविश्‍वासाने जीवनातील आव्हानांना सामोरे जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच यशस्वी जीवनासाठी आवश्यक असणार्‍या महत्वाच्या मुद्यांना डॉ. सोनी यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्पर्श केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधुरी बोरोले तर प्रमुख पाहुणे म्हणून जेसीआय डायमंड सिटीचे अध्यक्ष जीनल जैन यांची उपस्थिती होती. याप्रसंगी विजय सोनार, सुशील अग्रवाल, प्रसाद जगताप, हेमंलता चौधरी, विराज सोनी, राजेश जैन, शुभांगी श्रीश्रीमाळ, कमलेश अग्रवाल, प्रशांत पारीख आदींची उपस्थिती होती. तर अध्यापिका महाविद्यालयाच्या कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

Exit mobile version